आकाश ठाकूर अडकला
By Admin | Updated: May 19, 2015 01:57 IST2015-05-19T01:57:55+5:302015-05-19T01:57:55+5:30
जेल ब्रेक मधील तिसरा आरोपी आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर याच्या मुसक्या बांधण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने

आकाश ठाकूर अडकला
पांढुर्ण्यात बांधल्या मुसक्या : गुन्हेशाखेची कामगिरी
नागपूर : जेल ब्रेक मधील तिसरा आरोपी आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर याच्या मुसक्या बांधण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने सोमवारी यश मिळवले. तो पांढुर्ण्यात (मध्यप्रदेश) दडून होता. आरोपी आकाशला पकडण्यातसोबतच चार दिवसात गुन्हेशाखेच्या पथकाने दुसऱ्यांदा यश मिळवले.
३१ मार्चच्या पहाटे मध्यवर्ती कारागृहातून शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री, सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, बिशनसिंग रम्मूलाल उके आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर हे पाच खतरनाक कैदी पळून गेले होते. या घटनेमुळे कारागृह प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचीही नाचक्की झाली होती. त्यांना पकडण्यासाठी गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पथक रात्रंदिवस प्रयत्नरत होते. अखेर १४ मे रोजी त्यांना यश मिळाले. सोहेल खान ऊर्फ शिबु सलिम खान आणि प्रेम ऊर्फ नेपाळी शालिकराम खत्री या दोघांसोबच त्यांचा साथीदार अरमान मुन्ना याच्याही पोलिसांनी मुसक्या बांधल्या. ते सध्या गुन्हेशाखेच्या कस्टडीत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिसरा कैदी आकाश ठाकुर हा पांढुर्णा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून उपायुक्त दीपाली मासिरकर सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ढोले, ताथोड, एपीआय मंगेश देसाईआणि त्यांचे सहकारी सकाळी पांढुर्ण्यात पोहचेले.शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये शोधमोहिम राबविण्यात आली. दुपारी १ च्या सुमारास आकाश बसस्थानकाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळला. साध्या वेशातील पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला़ झटापटही केली. मात्र, पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
गर्दी अन् गडबड
दिवसाढवळ्या एका तरुणाला अनेकांनी पकडल्याचे आणि तो तरुण आरडाओरड करीत असल्याचे पाहून घटनास्थळी मोठी गर्दी जमली. गडबड झाल्यामुळे पोलीसही आले. गुन्हेशाखेच्या पथकाने पांढुर्णा पोलिसांना आरोपी आकाशबाबत माहिती दिली. तेथील ठाण्यात नोंदही केली आणि त्याला नागपुरात आणले. आकाशविरुद्ध वाहनचोरीचे १४ तर, लुटमारीचा एक गुन्हा आहे.