गँगवारच्या दहशतीत अजनी!
By Admin | Updated: July 10, 2014 00:51 IST2014-07-10T00:51:10+5:302014-07-10T00:51:10+5:30
अजनी ही रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत. पूर्वी या वसाहतीच्या संरक्षणासाठी गणेशपेठ पोलीस ठाण्याची अजनी ही चौकी होती. त्याकाळी अजनी भागात रेल्वे वॅगन फोडण्यावरून टोळीयुद्ध व्हायचे.

गँगवारच्या दहशतीत अजनी!
नवीन टोळ््यांचे अधिराज्य : गुन्हे वाढले, मनुष्यबळ घटले
मंगेश व्यवहारे - नागपूर
नागपूर : अजनी ही रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत. पूर्वी या वसाहतीच्या संरक्षणासाठी गणेशपेठ पोलीस ठाण्याची अजनी ही चौकी होती. त्याकाळी अजनी भागात रेल्वे वॅगन फोडण्यावरून टोळीयुद्ध व्हायचे. कोळशाची हेराफेरी मोठ्या प्रमाणात चालत होती. रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे अवैध दारू आणि जुगारांचे अड्डे फोफावले होते आणि या अवैध व्यवसायातूनच गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या. निक्सू, संमतसारख्या गँगस्टरने त्याकाळी आपली दहशत निर्माण केली होती. आज ते नाहीत, मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत काही नवीन टोळ्या तयार झाल्या आहेत. आजही गँगवारची दहशत कायम आहे.
गँगस्टरच्या टोळ्यांची वाटचाल सध्याच्या डीसीपी झोन चार कार्यालयात पूर्वी अजनीचे पोलीस ठाणे होते. त्याकाळी पोलीस ठाण्याच्या व्याप फार जास्त नव्हता. पुढे हळूहळू वस्त्या वाढल्या, गुन्हेगारी वाढली आणि पोलीस ठाण्याचा व्यापही वाढला. त्यामुळे १९८९ ला वंजारी नगर रोडवर हे पोलीस ठाणे हलविण्यात आले. अजनी पोलीस ठाण्याच्या निर्मिती पूर्वीपासून कुख्यात गुंडांच्या टोळ्यांची दहशत येथे राहिली आहे. अजनी भागात कुख्यात निक्सू फत्तेसिंग राठोड, संमद, पापा पाल आणि नर्मद चौधरी यांचे साम्राज्य होते. ठाण्याच्या हद्दीतील नवीन बाभूळखेडा भागातील परदेशी मोहल्ला आता चौधरी मोहल्ला या नावाने प्रसिद्ध आहे. १९६० ते ७० या काळात नर्मद ऊर्फ बुक्का हरिदास चौधरी याच्या दारूच्या भट्ट्या होत्या. नर्मद चौधरी आणि श्यामलाल या टोळ्यांची या भागात दहशत होती. नर्मदच्या अड्ड्यावर शहरभरातील गुन्हेगार आश्रय घ्यायचे. नर्मदच्या टोळीने एका फौजदाराचाही खून केला होता. नर्मदनेच ‘टोली’ या नावाने प्रसिद्ध वस्ती वसविली होती. नर्मदच्या नंतर दिलीप जोग्या, मनोज तिवारी, अमर धनविजय, या गुंडांची दहशत राहिली. त्यानंतर कुख्यात मनोज खांडेकर, इंदिरानगरातील रॉकी, गिजऱ्या लोणारे, बाळू मंडपे, प्रदीप भोयर या गुंडांनीही आपली दहशत पसरविली. सध्या अमर लोहकरे, नयन चिंतलवार यांच्या टोळ्या आहेत.
ठाण्याचे क्षेत्र आठ चौरस किलोमीटरच्या वर
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढल्याने सध्या या ठाण्याचे क्षेत्र आठ चौरस किलोमीटरच्या वर आहे. अंदाजे लोकसंख्या ३.५० लाखावर आहे. मेडिकल चौक, अजनी रेल्वे लाईन, नरेंद्रनगर, बेसा नाला, बेसा रोड, मानेवाडा सिमेंट रोड, क्रीडा चौक असे या पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र आहे. या ठाण्याच्या मेडिकल, शताब्दी चौक, बालाजीनगर व सिद्धेश्वर हॉलजवळ चौकी आहे. ठाण्याच्या हद्दीतील जोगीनगर, शताब्दीनगर, कौशल्यानगर, विश्वकर्मानगर, कुकडे ले-आऊट, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, टोली हा भाग अतिसंवेदनशील समजला जातो.
पुतळे व धार्मिक स्थळे
या ठाण्याच्या क्षेत्रात धार्मिक स्थळे आणि पुतळे बऱ्याच प्रमाणात आहे. ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांच्या विटंबनेच्या वादाचे पडसाद महाराष्ट्रभर पसरले आहे. ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २९ मंदिर, १५ चर्च, ३ मस्जिद, २ मदरसे व २१ पुतळे आहेत. तर ५ झोपडपट्ट्या आहेत.
आशियातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय, तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल येथे आहे.
मनुष्यबळाचा अभाव
पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता ३५०० ते ४००० लोकसंख्येमागे एक पोलीस कर्मचारी आहे. सध्या ठाण्यात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक दुय्यम पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक, ३० महिला पोलीस कर्मचारी, १०० पोलीस कॉन्स्टेबल असा एकूण १४५ पोलिसांचा स्टाफ आहे. प्रत्यक्ष मंजूर पदे लक्षात घेता, हे मनुष्यबळ अपुरे आहे.