विमानतळांजवळ कृषी निर्यात केंद्र हवे
By Admin | Updated: November 13, 2016 02:56 IST2016-11-13T02:56:50+5:302016-11-13T02:56:50+5:30
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी विमानतळाशेजारी

विमानतळांजवळ कृषी निर्यात केंद्र हवे
विजय रुपानी यांचे प्रतिपादन : ‘अॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकरी कार्यशाळांचे उद्घाटन
नागपूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी विमानतळाशेजारी कृषी निर्यात केंद्र आवश्यक आहे. गुजरातमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात वाढली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी उत्पादनाचा माल शेतातच उपलब्ध करून दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केले. रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या ‘अॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात आयोजित कार्यशाळांच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यमउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह हे उपस्थित होते. यावेळी मंचावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषक किसान सेलचे अजय वीर जाखड, सी.डी.मायी, टी.नंदकुमार, अमूलचे आर.एस.सोढी, संयोजक गिरीश गांधी,‘वेद’चे अध्यक्ष देवेन पारख, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. गुजरातमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचा विकास जास्त कसा होईल, यावर भर देण्यात येत आहे. कृषी कर्ज १८ ऐवजी केवळ १ टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यामुळे १ लाख ११ हजार कोटी रुपयांनी उत्पादनात वाढ झाली आहे व कृषी विकासाचा दर १७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. शेतकऱ्यांना शेतातच ‘ई-गाव’ व ‘ई-पोर्टल’च्या माध्यमातून जगातील सर्व कृषी उत्पादनाचे भाव उपलब्ध होत आहेत.शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट कसे होईल, यासाठी गुजरात सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती रुपानी यांनी दिली.
यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. येत्या काळात ‘वेस्ट इन टू बेस्ट’ या प्रणालीवर काम करण्यात येणार आहे. गुजरातमध्येदेखील ‘बायोटेक्नॉलॉजी’ व ‘मिथेनॉल’ निर्मितीचा प्रयोग राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गडकरी यांनी कृषीक्षेत्रातील ‘गुजरात मॉडेल’ची प्रशंसा केली. महाराष्ट्रातदेखील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इत्यादी विमानतळाजवळील ५ एकर जमिनीवर शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रकल्प सुरू झाले पाहिजे. तसेच सिंचनासाठी ४० हजार कोटींची तरतूद झाली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी कृषी कल्याणच्या ‘ऊस’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी.मायी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर रवी बोरटकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दूध उत्पादनात वाढ हवी
यावेळी नितीन गडकरी यांनी दूध उत्पादन वाढीसंदर्भात भाष्य केले. महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थान आणि गुजरातमध्ये दूध उत्पादनाचे प्रमाण दुप्पट आहे. दूध उत्पादनात गुजरातचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. ‘एनडीटीबी’ च्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्याचे आव्हान शेतकऱ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.
गडकरी माझे गुरू : गिरीराज सिंह
यावेळी गिरीराज सिंह यांनी नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले. नितीन गडकरी हे माझे गुरूच आहेत. त्यांच्यापासून मी नेहमीच मार्गदर्शन घेतो, असे सिंह म्हणाले. देशात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक पिकांसाठी शेकडो लिटर पाणी लागते. मात्र पाण्याची कमतरता लक्षात घेता योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.