सात कोटी मुलांना हवा आधार
By Admin | Updated: September 22, 2014 00:57 IST2014-09-22T00:57:45+5:302014-09-22T00:57:45+5:30
देशात एकूण सात कोटी मतिमंद मुले आहेत. आईवडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांचा कुणीच वाली नाही. अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची आवश्यकता आहे.

सात कोटी मुलांना हवा आधार
शंकरबाबा पापळकर यांचे आवाहन
नागपूर : देशात एकूण सात कोटी मतिमंद मुले आहेत. आईवडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांचा कुणीच वाली नाही. अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची आवश्यकता आहे. त्यांना मायेचा आधार हवा आहे, असे आवाहन अनाथ आणि अपंग मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर यांनी आज येथे केले.
रेड स्वस्तिक सोसायटी नागपूर शाखेतर्फे शुश्रृषा हार्ट केअर सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नेरुळ मुंबईच्या संयुक्त विद्यमाने सुभाष मार्गावरील श्री गुरुदेव सेवा मंडळात आयोजित शस्त्रक्रियापूर्व हृदयरोग तपासणी शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विकास बिसने, डॉ. अश्विन भोसले, अरविंद धजेकर, डॉ. टी. एस. भाल, रेड क्रॉस सोसायटीचे सहसंचालक अशोक शिंदे, माहिती खात्याचे अनिल गडेकर, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. रोहित कळमकर उपस्थित होते.
शंकरबाबा पापळकर यांनी रेड क्रॉस सोसायटीच्या कामाचे कौतुक केले. सोसायटीत अनेक ज्येष्ठ नागरिक असून तडफदार तरुणांनाही सोसायटीत सहभागी करून कार्याला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. विकास बिसने म्हणाले, हृदयाची शस्त्रक्रिया करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. त्यामुळे अशा शिबिरातून मोफत शस्त्रक्रिया करण्याचे पुण्य मिळते. प्रत्येक कुटुंबाने एका मुलाला दत्तक घेण्याची गरज आहे. तसेच एका डॉक्टरने दररोज एक रुग्ण मोफत केल्यास वर्षाकाठी ३६५ रुग्णांना त्याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. अरविंद धजेकर यांनी रुग्णांना रांगेत उभे राहून तपासणी करण्याचे आवाहन केले. डॉ. टी. एस. भाल यांनी गोरगरिबांना लाभ व्हावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याची माहिती दिली.
डॉ. अशोक शिंदे यांनी सोसायटीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. अश्विन भोसले यांनी शुश्रृषा हार्ट केअरतर्फे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली. आभार डॉ. मिलिंद नाईक यांनी मानले. शिबिराचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. (प्रतिनिधी)