आकाशवाणीने दिली ओळख
By Admin | Updated: October 6, 2015 04:28 IST2015-10-06T04:28:46+5:302015-10-06T04:28:46+5:30
देशभरात लाखो उद्घोषक आहेत. मात्र त्यात मला जे स्थान मिळाले, लोकप्रियता मिळाली, ती केवळ आकाशवाणीमुळे.

आकाशवाणीने दिली ओळख
मैत्री परिवार संस्थेतर्फे आयोजन : किशनजी शर्मा यांचे प्रतिपादन
नागपूर : देशभरात लाखो उद्घोषक आहेत. मात्र त्यात मला जे स्थान मिळाले, लोकप्रियता मिळाली, ती केवळ आकाशवाणीमुळे. आकाशवाणीने मला त्या सर्वांपेक्षा वेगळी ओळख दिली, असे प्रतिपादन आकाशवाणीचे प्रसिद्ध उद्घोषक किशनजी शर्मा यांनी केले.
मैत्री परिवार संस्थेतर्फे ‘गीतों की बात किशनजी के साथ’ या संगीत मैफलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. बजाजनगर चौकातील ‘विष्णूजी की रसोई’ येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी व कुंदाताई विजयकर यांच्या हस्ते शर्मा यांना शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशनजी शर्मा यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नागपुरातील कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा देत, ‘गुंज उठी शहनाई’या चित्रपटातील त्यांच्या शहनाईच्या जादूचा किस्सा सांगितला. तसेच अशोक कुमार यांचे नागपूरशी जुळलेले नाते व त्यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाची माहिती दिली. यानंतर सुरू झालेल्या संगीत मैफिलीत ते प्रत्येक गाण्यापूर्वी त्या गाण्यामागील विशेष पार्श्वभूमी आपल्या खास शैलीत श्रोत्यांपुढे सादर करीत होते. यामुळे या संगीत मैफिलीला काही वेगळाच रंग चढला होता. कार्यक्रमाला डॉ. पीयूषकुमार, प्रा. संजय भेंडे, विष्णू मनोहर व मंजुषा पांढरीपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद पेंडके यांनी केले. संचालन प्रा. माधुरी यावलकर यांनी करून विजय जथे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तेरे सुर और मेरे गीत...
४प्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांनी ‘तेरे सुर और मेरे गीत...’ या लोकप्रिय गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘तूम मुझे भुल भी जाओ..’, ‘चैन से हमको कभी...’, ‘सुन सायबा सुन..’, ‘ये रात भीगी भीगी..’, ‘तोरा मन दर्पण..’, ‘दील दीवाना बीन सजना के..’, ही गाणी सादर केली. तसेच गायक अमर कुलकर्णी यांनी ‘उपर गगन विशाल...’, ‘कभी कभी मेरे दिल मे...’ व ‘गीत नया गाता हु...’ अशा गीतांसह सारंग जोशी यांनी ‘चलो एक बार फीरसे...’, ‘मधुबन मे राधिका...’, ‘आपके हसीन रुख पे...’, ‘दिल दीवाना बीन सजना के..’अशा गीतांनी ही मैफील सजविली होती. या मैफिलीदरम्यान विष्णू मनोहर यांनी अटलजींच्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमात वादक म्हणून सचिन ढोमणे, उज्ज्वला गोकर्ण, अमर शेंडे, गोविंद गडीकर, सलील मुळे व नंदु गोहाने यांनी साथ दिली. तर ध्वनी पराग फुसे व इकबाल भाई यांनी मंच सजावट केली होती.