रक्षिकाची ‘एम्स’ भरारी
By Admin | Updated: June 27, 2014 00:41 IST2014-06-27T00:41:16+5:302014-06-27T00:41:16+5:30
नवी दिल्ली येथील ‘एम्स’च्या (आॅल इंडिया इस्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस)वतीने गेल्या १ जून रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेमध्ये नागपूरच्या रक्षिका तेलतुंबडे हिने बाजी

रक्षिकाची ‘एम्स’ भरारी
उपराजधानीचे नाव उंचावले : ‘एम्स’च्या खडतर परीक्षेत उत्तीर्ण
नागपूर : नवी दिल्ली येथील ‘एम्स’च्या (आॅल इंडिया इस्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस)वतीने गेल्या १ जून रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेमध्ये नागपूरच्या रक्षिका तेलतुंबडे हिने बाजी मारली आहे. ‘एम्स’ची परीक्षा ही अतिशय कठीण समजली जाते. त्यामुळे मागील काही वर्षांचा विचार केला असता नागपूरच नव्हे तर विदर्भातून ही परीक्षा उत्तीर्ण करणारी रक्षिका ही पहिली मुलगी असण्याची शक्यता आहे. तिच्या या यशाने नागपूरची मान उंचावली आहे.
संपूर्ण देशात ६७२ जागांसाठी देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या रक्षिकाने बाजी मारली. रक्षिकाने एम.एच.सी.ई.टी., ए.आय.पी.एम.टी., तसेच सेवाग्राम वर्धा या परीक्षासुद्धा उत्तीर्ण केल्या आहेत. सध्या तिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. रक्षिका ही दहावीच्या परीक्षेत नागपुरातून तिसरी तर मागासवर्गीयांमधून पहिली आली होती. बारावीच्या परीक्षेत तिने ९० टक्के गुण प्राप्त केले होते. रक्षिकेचे वडील रवींद्र आणि आई प्रतिभा हे दोघेही बँकेत आहेत. मोठी बहीण रुचिका ही इंजिनियर आहे. (प्रतिनिधी)
‘बेसिक’ समजून घेणे महत्त्वाचे
एक प्रसिद्ध डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याचे रक्षिकाचे स्वप्न होते. ते स्वप्न ‘एम्स’च्या प्रवेशातून पूर्ण होणार आहे. ‘एम्स’ प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी तिने अकराव्या वर्गापासूनच सुरू केली होती. परंतु यासाठी तिने घेतलेली मेहनतही महत्त्वाची आहे. ‘एम्स’च्या परीक्षेतच जनरल नॉलेजलाही अधिक महत्त्व असल्याने दररोज ६ ते ८ तास अभ्यास करण्याबरोबरच दैनंदिन घडामोडीवरही तिचे बारीक लक्ष राहायचे. कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना विषयातील ‘बेसिक’ समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रक्षिकाचे सांगणे आहे.