- फहीम खाननागपूर - अपघातग्रस्त विमानाचा पायलट अनुभवी असूनही त्यांना आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठी वेळच मिळाला नाही. ही घटना जर काही हजार फूट उंचीवर झाली असती, तर पायलटकडे अनेक पर्याय असते, असे मुंबईतील जेटफ्लीट एव्हिएशनचे संस्थापक व एव्हिएशन तज्ज्ञ शनिल देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले की, उड्डाणापूर्वी नेहमीच ‘अरायव्हल टेस्ट’ केली जाते. हे विमान सकाळीच दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले होते. त्यामुळे हे टेस्टिंग झाले असणार. मात्र टेकऑफनंतर लगेचच काही तांत्रिक बिघाड झाला असावा.
विमान चालविणारे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे ८२०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. उड्डाणानंतर अवघ्या एका मिनिटात, १:३९ वाजता त्यांनी ‘मे डे’ कॉल दिला, पण त्यानंतर विमानाचा एटीसीशी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क तुटला. अशा स्थितीत विमान वाचविण्यासाठी सभरवाल यांना फार काहीही करता येणे शक्यच नव्हते.
‘विमानाचे लँडिंग गिअर आत घेतले नव्हते’सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टेकऑफ झाल्यानंतर ५ मिनिटे झाली, तरीही विमानाचे लँडिंग गिअर आत घेतले गेले नव्हते. हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणानंतर सामान्यतः १०–१५ सेकंदांच्या आत हे गिअर आत घेतले जातात. मात्र गिअर बाहेरच राहणे ही गंभीर तांत्रिक अडचण असू शकते. ही संपूर्ण घटना डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) आणि एएआय (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) यांच्या सखोल चौकशीचा विषय आहे असेही ते म्हणाले.