कृषी क्षेत्राच्या उत्पादनात २५ टक्के वाढ आवश्यक
By Admin | Updated: May 4, 2015 02:20 IST2015-05-04T02:20:54+5:302015-05-04T02:20:54+5:30
देशाच्या सकल उत्पादनात सेवाक्षेत्राचा वाटा ६२ टक्के तर कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १४ टक्के आहे.

कृषी क्षेत्राच्या उत्पादनात २५ टक्के वाढ आवश्यक
नागपूर: देशाच्या सकल उत्पादनात सेवाक्षेत्राचा वाटा ६२ टक्के तर कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १४ टक्के आहे. मात्र देशाची ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे गरिबी आणि बेरोजगारीत वाढ होत आहे. हे चित्र पालटायचे असेल तर कृषी क्षेत्राच्या सकल उत्पादनात २५ टक्केपर्यंत वाढ करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पाण्याचे योग्य नियोजन केल्यास कृषी उत्पादनात वाढ होत असल्याचे अनेक राज्यात दिसून आले आहे. मध्य प्रदेशमध्ये कृषी विकासाचा दर २३ टक्के, गुजरातमध्ये १४ टक्के तर महाराष्ट्रात फक्त ४ टक्के आहे. गावात पाणी आल्यास गावाचे अर्थशास्त्र बदलते, या दृष्टीने जलयुक्त शिवार ही योजना राबवा. देशातील विविध राज्यात पाण्यासाठी वाद आहेत, पण वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी कुणीच काही करीत नाही. पाणी अडविले नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवून पुढच्या वर्षी जिल्ह्यात एकही टॅन्कर धावणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे, गोसेखुर्द पुनर्वसनाचे काम तातडीने करावे, पशुपालन, गोदुग्ध उत्पादनसाठी जास्त दूध देणाऱ्या गार्इंची संख्या विदर्भात वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना स्वस्त: दरात खत (पोटॅश) उपलब्ध व्हावे यासाठी इराणमध्ये सरकारच्या माध्यमातून पोर्ट बांधण्यात येत असून तेथी गॅस कमी किमतीत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात यश आल्यास भारतात कमी दरात खत उपलब्ध होऊ शकेल.
त्याचप्रमाणे धापेवाडा येथे केसावर प्रक्रिया करून रसायन तयार करणारा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून हे रसायन शेतीसाठी उपयोगी आहे. (प्रतिनिधी)