दोन लाख शेतकऱ्यांना कृषीपंपाची जोडणी

By Admin | Updated: August 12, 2015 03:37 IST2015-08-12T03:37:27+5:302015-08-12T03:37:27+5:30

पुढील वर्षभरात विदर्भ व मराठवाड्यातील दोन लाख शेतकऱ्यांना कृषीपंपाची जोडणी दिली जाईल, अशी राज्याचे

Agricultural Connectivity to Two Lakh Farmers | दोन लाख शेतकऱ्यांना कृषीपंपाची जोडणी

दोन लाख शेतकऱ्यांना कृषीपंपाची जोडणी

हुडकेश्वर (खुर्द) येथील उपकेंद्राचे उद्घाटन : ऊर्जामंत्र्यांनी दिली माहिती
नागपूर : पुढील वर्षभरात विदर्भ व मराठवाड्यातील दोन लाख शेतकऱ्यांना कृषीपंपाची जोडणी दिली जाईल, अशी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती देऊन यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. यात नागपूर जिल्ह्यासाठी ४६ कोटी रुपयांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (महावितरण) कंपनीच्या पायाभूत आराखडा टप्पा-२ अंतर्गंत हुडकेश्वर (खुर्द) येथील नवनिर्मित ३३/११ के. व्ही. उपकेंद्राचे सोमवारी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा निशाताई सावरकर होत्या. बावनकुळे म्हणाले, नागपूर तालुक्यातील हुडकेश्वर,नरसाळा व पिपळा येथील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित असून जामठा, बेसा, बेलतरोडी व बहादुरा येथेही नवीन उपकेंद्रांचा प्रस्ताव आहे. शिवाय नागपूर शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी २०० कोटींचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. मागील १५ वर्षांत प्रथमच विजेचे दर कमी झाले असून सर्व शासकीय शाळा व रुग्णालयांचे वीजबिल ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. याशिवाय मिहान येथील औद्योगिक वीजदर राज्यात सर्वांत कमी असून येथील विजेचा प्रश्न सुटल्याने उद्योगांना चालना मिळून नवीन रोजगार निर्मिती वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच येत्या पाच वर्षांत नागपूर तालुका आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख शैक्षणिक केंद्र होणार असल्याने त्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करू न देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला जि. प. सदस्या शुभांगी गायधने, पं. स. सदस्य अजय बोढारे, मंजुषा भांबुलकर, सरपंच वर्षा बारसागडे, उपसरपंच कमलाकर शेंडे, मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर, सुरेश मडावी, मनोहर लांडे, आर.एम. बुंदिले, आर. आर. जनबंधू, कार्यकारी अभियंता सचिन तालेवार, युवराज मेश्राम, महेंद्र ढोबळे व व्ही. डी. राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता मोहन झोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकारी अभियंता सुहास मैत्रे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Agricultural Connectivity to Two Lakh Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.