तीस कोटींच्या घोटाळ्यातील एजीएमचा डायरेक्टर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:05+5:302021-02-05T04:49:05+5:30
विविध प्रांतातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक - तीन महिन्यांपासून लपवाछपवी - अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या नरेश डोंगरे । लोकमत न्यूज ...

तीस कोटींच्या घोटाळ्यातील एजीएमचा डायरेक्टर जेरबंद
विविध प्रांतातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक - तीन महिन्यांपासून लपवाछपवी - अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकर्षक योजनांचे मायाजाल निर्माण करून विविध प्रांतांतील शेकडो गुंतवणूकदारांचे ३० कोटी रुपये गिळंकृत करणाऱ्या चारपैकी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने शनिवारी अटक केली. अजय लदवे असे त्याचे नाव असून तो एजीएम कॉर्पोरेशन डिजिटल ॲडव्हर्टाईजमेंट कंपनीचा डायरेक्टर आहे.
आरोपी सुशील रमेश कोल्हे (वय २९), पंकज रमेश कोल्हे (वय २७), भरत शाहू आणि अजय लदवे यांनी १ एप्रिल (एप्रिल फूलच्या दिवशी) २०१८ला एजीएम कॉर्पोरेशन डिजिटल ॲडव्हर्टाईजमेंट कंपनी सुरू केली. सीताबर्डीच्या उत्कर्ष अपार्टमेंटमध्ये कंपनीचे कार्यालय थाटले. नुसत्या कागदांवर या चाैकडीने आकर्षक योजनांचे मायाजाल निर्माण केले. गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेवर रॉयल्टी, व्याज आणि बोनस देण्याची थाप मारून आपल्या एजंटच्या माध्यमातून त्यांनी ठिकठिकाणच्या उद्योजक, व्यावसायिक, छोटेमोठे दुकानदार तसेच सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले. केवळ १८ महिन्यात रक्कम दुप्पट मिळत असल्याच्या आमिषापोटी महाराष्ट्रच नव्हे तर आजूबाजूच्या प्रांतातूनही या ठगबाजांकडे गुंतवणूकदारांनी आपली जमापुंजी गुंतविली. विशिष्ट योजनेच्या गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर त्यांनी आरोपींकडे आपली रक्कम परत मागणे सुरू केले. प्रारंभी वेगवेगळे कारण सांगून टाळाटाळ करणाऱ्या आरोपींनी ऑक्टोबर २०२०च्या अखेर कंपनीला टाळे लावले. त्यांनी आपले फोनही बंद केले. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले. ठिकठिकाणचे गुंतवणूकदार नागपुरात कंपनीच्या कार्यालयात येऊन चौकशी करू लागले. त्यातून उपरोक्त चौकडी आणि त्यांच्या एजीएम कंपनीतर्फे करण्यात आलेल्या फसवणुकीचा भंडाफोड झाला. अस्वस्थ गुंतवणूकदारांनी सीताबर्डी पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरण कोट्यवधींच्या फसवणुकीचे असल्याने ते गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे (ईओडब्ल्यू) गेले. चाैकशीत चाैकडीने कट कारस्थान करून फसवणूक केल्यानंतर गाशा गुंडाळल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ठेवीदार नागेंद्रसिंग बाबूसिंग ठाकूर (वय ६५, रा. बैतूल, मध्य प्रदेश) यांची तक्रार नोंदवून सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वीच ही चाैकडी फरार झाली होती. ईओडब्ल्यूचे पोलीस पथकं तेव्हापासून उपरोक्त आरोपींचा शोध घेत होते. यातील आरोपी अजय लदवे हा उमरेडजवळ असल्याची माहिती शनिवारी दुपारी पोलिसांना मिळाली. त्यावरून ईओडब्ल्यूचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ईओडब्ल्यूचे निरीक्षक प्रशांत माने आणि सहकाऱ्यांनी तिकडे धाव घेऊन आरोपीच्या मुसक्या बांधल्या.
----
अन्य आरोपींचा लवकरच छडा
एक आरोपी पकडल्यामुळे आता पोलिसांचे मनोबल उंचावले आहे. फरारीच्या काळात सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात असतील, असा अंदाज आहे. त्यामुळे आरोपी अजय लदवेच्या माध्यमातून या प्रकरणातील अन्य आरोपींचाही लवकरच छडा लागेल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
----