मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्ते धडकले

By Admin | Updated: November 1, 2014 02:47 IST2014-11-01T02:47:07+5:302014-11-01T02:47:07+5:30

पाथर्डी तालुक्यातील जवखडे येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाला १३ दिवस लोटले.

The agitators came under the CM's residence | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्ते धडकले

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्ते धडकले

नागपूर : पाथर्डी तालुक्यातील जवखडे येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाला १३ दिवस लोटले. परंतु अजूनही या हत्याकांडातील खऱ्या आरोपींना अटक करण्यात न आल्याने आंबेडकरी संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा भडका शुक्रवारी उडाला. राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होते, त्यावेळी नागपुरात त्यांच्या निवासस्थानी काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धडक देत या हत्याकांडाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.
कवलेवाडा हत्याकांडाची घटना ताजी असताना गेल्या २० आॅक्टोबर रोजी जि. अहमदनगर ता. पाथर्डी येथील जवखेडे या गावातील १९ वर्षाचा हुशार मुलगा सुनील जाधव, त्याचे वडील संजय जाधव व आई जयश्री जाधव यांची झोपेत अमानुषपणे हत्या करण्यात आली. जातीय मानसिकतेतून करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे आंबेडकरी समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अजूनही हत्याकांडातील मुख्य आरोपींना अटक न झाल्याने असंतोष वाढला आहे. त्यामुळे या घटनेच्या गांभीर्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने आक्रमण युवक संघटना, निळाई, भारिप बहुजन महासंघ, रिपाइं सेक्युलर, आॅल इंडिया बॅकवर्ड क्लासेस लॉयर्स अ‍ॅण्ड लॉ ग्रॅज्युएट असोसिएशन, समृद्ध महिला मंडळ आदी संघटनांनी संयुक्तपणे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला.
दुपारी ३.३० वाजता धरमपेठ बुद्धविहार येथून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळा सुरू होता. त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. त्यांच्या हातात बॅनर होते. दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ घोषणा देत आंदोलनकर्ते चालत होते. जवखेडे हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. आरोपींना तातडीने अटक करावी. कवलेवाडा प्रकरणातील दोषी पोलिसांना बरखास्त करण्यात यावे, आदी मागण्या आंदोलक करीत होते. त्रिकोणी पार्कजवळ पोलिसांनी त्यांना रोखले व अटक केली.
अटक झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये डॉ. संदीप नंदेश्वर, प्रमोद पाटील, विशाल वानखेडे, विजय वासे, अलका माटे, चंद्रशेखर कांबळे, राहुल वैद्य, संगीता रामटेके, वैशाली मानवटकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: The agitators came under the CM's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.