जाहीरनाम्यात हवा दलित विकासाचाही अजेंडा
By Admin | Updated: September 6, 2014 03:02 IST2014-09-06T03:02:33+5:302014-09-06T03:02:33+5:30
महायुतीमध्ये रिपाइं हा महत्त्वाचा घटक असून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दलितांनी भरघोस मतदान केले आहे.

जाहीरनाम्यात हवा दलित विकासाचाही अजेंडा
नागपूर : महायुतीमध्ये रिपाइं हा महत्त्वाचा घटक असून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दलितांनी भरघोस मतदान केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये दलित विकासाचा अजेंडा सुद्धा सामील करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली.
एका कार्यक्रमासाठी आठवले शुक्रवारी नागपुरात आले असता रविभवनात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. काँग्रेसने सन्मानाची वागणूक न दिल्यामुळेच आपण भाजपा-शिवसेनेशी युती केली आहे. रिपाइं युतीमध्ये सामील झाल्यावरच ती महायुती झाली आहे. तेव्हा जागा वाटप करताना काँग्रेससारखी भूमिका न घेता भाजप-सेनेने योग्य निर्णय घेत सन्मान राखावा, अशी अपेक्षासुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महायुतीचा जाहीरनामा तयार करीत असताना दलित विकासाचा अजेंडा असावा त्यात खासगी क्षेत्रात आरक्षण, भूमिहिनांचा प्रश्न, महामंडळाच्या वित्त मदतीमध्ये वाढ, जमिनीचे राष्ट्रीयीकरण, प्रत्येक भूमिहिनांना ५ एकर जमीन आदी प्रश्नांचा समावेश करण्यात यावा. रिपाइंमध्ये सध्या अनेक लोक येण्यास उत्त्सुक आहेत. विविध क्षेत्रातील लोकांनी पक्षात प्रवेश घेतला आहे. अभिनेत्री राखी सावंत, माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे हे पक्षात आले असून लवकरच अनेक माजी सनदी अधिकारी पक्षात येणार आहेत. या सर्वांचा लाभ पक्षाला निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारताला नुकतेच अव्हान दिले असून भारतानेसुद्धा त्यांना जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली.
पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे, राजन वाघमारे, बाळू घरडे, आर.एस. वानखेडे, प्रा. पवन गजभिये, रवी शेंडे आदी उपस्थित होते.