पुन्हा एका टोळीवर मकोका
By Admin | Updated: January 31, 2016 02:55 IST2016-01-31T02:55:57+5:302016-01-31T02:55:57+5:30
चैतन्य सुभाष आष्टनकर (वय १४) याच्या अपहरणकर्त्यांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे.

पुन्हा एका टोळीवर मकोका
चैतन्य अपहरण कांड : गुन्हेगारी वर्तुळाला जबरदस्त हादरा
नागपूर : चैतन्य सुभाष आष्टनकर (वय १४) याच्या अपहरणकर्त्यांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी आज रात्री पत्रकारांना ही माहिती दिली. गुन्हेगारी वर्तुळाला जबरदस्त हादरा देणारी चार दिवसांतील मोक्काची ही चौथी कारवाई होय.
सोनेगांवच्या पाप्युलर सोसायटीत राहणारे सुभाष आत्मारामजी आष्टनकर (वय ५३) यांच्या चैतन्य नामक मुलाचे ७ जानेवारीला दुपारी अपहरण झाले होते. ५० लाखांच्या खंडणीसाठी प्रदीप ओमदास निनावे (वय ३६, रा. साईबाबा नगर, खरबी रिंग रोड, नागपूर) याच्या सांगण्यावरून आरोपी मुकेश उर्फ छट्टी किसन तायवाडे (वय २६, खापा, सावनेर), इसाक शेख इजराईल शेख (वय ३६, रा. खापा), दुर्वास भगवान कोहळे (वय २८, रा. खापा), तय्युब समशेर शेख (वय ३०, रा. खापा) आणि प्रभाकर संतोष खोब्रागडे (वय ४०, रा. खापा) यांनी हे अपहरण केले होते. कसून तपास केल्यानंतर तब्बल ३२ तासानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने आरोपी इसाकला खापा-सावनेर दरम्यान पकडले. त्याच्या ताब्यातून चैतन्यची सुटका केली. या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुन्हेगार मुकेश ऊर्फ छट्टी अद्याप फरार आहे. अटकेतील आरोपींच्या गुन्ह्यांचा अभिलेख (क्राईम रेकॉर्ड) लक्षात घेता पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी उपरोक्त गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी शेखर तोरे यांनी चौकशी करून उपरोक्त गुन्हेगारांवर आज मोक्का लावल्याचे उपायुक्त बलकवडे यांनी सांगितले.