‘नीट’च्या महाघोटाळ्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून गंड्याचा फंडा

By योगेश पांडे | Updated: January 23, 2025 23:52 IST2025-01-23T23:52:00+5:302025-01-23T23:52:27+5:30

आरोपी परिमल कोतपल्लीवारवर झाली होती सीबीआयची कारवाई : नागपूर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढली हिंमत

After the NEET scam, a swindler's fund was created from the management quota. | ‘नीट’च्या महाघोटाळ्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून गंड्याचा फंडा

‘नीट’च्या महाघोटाळ्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून गंड्याचा फंडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नीटमध्ये कमी गुण मिळालेल्या दोन मुलींचे मॅनेजमेंट कोट्यातून मेडिकलमध्ये ॲडमिशन करून देण्याची बतावणी करून त्यांची ७५ लाख ७५ हजारांनी फसवणूक करण्यात आलेल्या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर रुजलेले आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार आर. के. एज्युकेशनचा संचालक परिमल कोतपल्लीवार विरोधात सव्वातीन वर्षांअगोदर सीबीआयने कारवाई केली होती. देशभरातील ‘नीट’च्या महाघोटाळ्यात तो सहभागी होता. मात्र या प्रकरणात लॉकअपमधून बाहेर येताच त्याने मॅनेजमेंट कोट्यातून वैद्यकीय अभ्यासक्रमाचा फंडा समोर करत गंडा घालण्यास सुरुवात केली. ‘लोकमत’नेच त्याच्या महाघोटाळ्याच्या ‘मोडस ऑपरेंडी’वर प्रकाश टाकला होता.

परिमल व त्याच्या सहकाऱ्यांनी पाँडिचेरी येथील श्रीलक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे प्रवेश मिळवून देतो अशी बतावणी करून दोन पालकांना ७५ लाखांनी गंडविले. या प्रकारामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशाच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा परत उघडकीस आला आहे. याच कोतपल्लीवारने देशपातळीवर नीटचा महाघोटाळा केला होता. नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी लाखो रुपये उकळून डमी उमेदवार बसविण्याचे हे रॅकेट होते. २०२१ मध्ये सीबीआयने याचा भंडाफोड केला होता व परिमलला अटक केली होती. तेथून सुटताच परिमलने नवीन जागेत कार्यालय उघडून परत मेडिकलच्या प्रवेशाचा गोरखधंदा सुरू केला होता. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने पॅकेज प्रणालीच सुरू केली होती. याअंतर्गत तो ४० लाख, ५० लाख, ७५ लाख असे पॅकेजेसच पालकांना सांगत असे.

कार्यालयाचा पत्ता बदलला, मात्र गोरखधंदा तसाच
परिमलने नीटचा महाघोटाळा केला तेव्हा त्याचे कार्यालय नंदनवन मुख्य मार्गाजवळ होते. तेथे सीबीआयने धाडदेखील टाकली होती. काही महिन्यांनी त्याने टेलिफोन एक्सचेंज चौकात कार्यालय सुरू केले. त्याचे एजंट्स देशभरात कार्यरत होते व त्यांच्या माध्यमातून कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ते प्रवेशासाठी इच्छुक पालकांना हेरायचे. एकीकडे ‘नीट’मध्ये चांगले गुण मिळावे यासाठी मेहनत करून विद्यार्थी तयार करत असताना शॉर्टकट प्रवेशाचे आमिष दाखवत परिमलने मॅनेजमेंट कोट्याच्या नावाखाली हे रॅकेट सुरू केले.

अनेक वर्षांपासून सक्रिय, पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष
ज्याच्यावर सीबीआयची कारवाई झाली आहे त्या व्यक्तीने शहरातील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय उघडले असल्याची पोलिसांना माहिती होती. मात्र पोलिसांनी त्याची चौकशी करण्याची तसदीदेखील घेतली नाही. परिमल वैद्यकीय प्रवेशाच्या गैरप्रकारांमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असून २०१५ सालीदेखील परिमलला अशाच प्रकरणात अटक झाली होती. २०१५ साली देशाच्या शिक्षणवर्तुळाला हादरविणाऱ्या ‘एआयपीएमटी’ परीक्षेत ‘हायटेक कॉपी’च्या ‘रॅकेट’मध्ये तो एजंट म्हणून सहभागी होता. या प्रकारावर हरयाणा ‘एसआयटी’ची नजर होती व त्याला अटक करण्यात आली होती. मात्र सुटका झाल्यावर त्याने परत नवीन ‘रॅकेट’ सुरू केले. एआयपीएमटी परीक्षेत अत्याधुनिक ‘गॅजेट्स’चा वापर करून ‘कॉपी’ करण्याच्या प्रकाराने देशभरातील शिक्षण वर्तुळाला हादरा बसला होता.

Web Title: After the NEET scam, a swindler's fund was created from the management quota.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.