अज्ञात स्थळी सोबत गेल्यावरच संतती सुख
By Admin | Updated: June 4, 2015 02:24 IST2015-06-04T02:24:26+5:302015-06-04T02:24:26+5:30
जादूटोणाद्वारे संततीसुख मिळवून देण्याचा दावा करणारा मांत्रिक कळमना पोलिसांच्या हाती लागला आहे.

अज्ञात स्थळी सोबत गेल्यावरच संतती सुख
जादूटोणा करणारा मांत्रिक अटकेत : अनेकांना फसविले
नागपूर : जादूटोणाद्वारे संततीसुख मिळवून देण्याचा दावा करणारा मांत्रिक कळमना पोलिसांच्या हाती लागला आहे. तो पीडित महिलांवर अज्ञात स्थळी चालण्यासाठी दबाव टाकीत होता. नकार दिल्यास होणारे मूल जिवंत राहणार नाही, अशी भीती दाखवून त्याने आजवर अनेकांना फसविले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांच्या मदतीने मांत्रिकाला पकडले. पोलिसांनी त्याच्या एका साथीदारालाही अटक केली आहे.
जैनसिंग तुतरवार ऊर्फ मांत्रिक राजू गांधी आणि पंडित राजकुमार नीमा ऊर्फ माहेश्वरी अशी आरोपीची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी माहेश्वरी याची मस्कासाथ येथे पूजेच्या साहित्याचे दुकान आहे. तो बारईपुरा येथे राहतो. पूजेचे साहित्य घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना विशेषत: महिलांना तो आपल्या जाळ्यात अडकवत होता. संततीसुखापासून वंचित असणारे, प्रेमभंग झालेले, कर्जबाजारी किंवा इतर समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांना तो जादूटोणाच्या माध्यमातून ठिक करण्याचे आमिष दाखवित होता. समस्या मोठी असल्यास तो ग्राहकाला गांधीकडे पाठवित होता. गांधी हा वरिष्ठ मांत्रिक असल्याचे तो इतरांना सांगायचा.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबाबत तक्रार मिळाली. त्यांनी मांत्रिकाला रंगेहाथ पकडण्यासाठी योजना आखली. त्या योजनेनुसार एक बनावट पीडित असलेल्या महिलेने संततीसुखासाठी माहेश्वरी याच्याशी संपर्क साधला. त्याने ५ मे रोजी महिलेला २१ लिंबू, पूजा साहित्य आणि २१ रुपये घेऊन घरी बोलाविले. तिथे महिलेच्या शरीरावर कालिमाता आल्याचे सांगितले. स्वत: जादूटोणा केल्यानंतर तिची समस्या मोठी असल्याने वरिष्ठ मांत्रिकच ती दूर करू शकतात, असे सांगितले. तसेच त्यासाठी ५०० रुपये द्यावे लागतील, आणि सांगितलेल्या जागेवर चलावे लागेल, असेही स्पष्ट केले. योजनेनुसार महिलेने होकार दिला. माहेश्वरीने तिला पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी वरिष्ठ मांत्रिक म्हणजेच गांधीच्या दरबारात चलण्यास सांगितले.
माहेश्वरी महिलेला मंगळवारी सकाळी गांधी याच्या संजय गांधीनगर स्थित घरी घेऊन गेला. तिथे इतरही विविध समस्यांनी त्रस्त महिला आल्या होत्या. मांत्रिकाने महिलेला एका प्रतिमेसमोर उभे केले. आपल्या शरीरात देवी आल्याचे भासविले. ५०० रुपये आणि पूजेचे साहित्य चढविल्यानंतर एका अज्ञातस्थळी चालण्यास सांगितले; तसेच त्या ठिकाणी पती येणे आवश्यक नाही, असेही बजावले. त्या ठिकाणी चलण्यास नकार दिल्यास तो आपल्या जादूटोण्याने मृत मुलास जन्माला घालेल.
यानंतर मांत्रिक व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. पोलिसांनी कोणत्या अज्ञातस्थळी महिलांना नेले जाते, यासंबंधात विचारणा केली, तेव्हा दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मांत्रिक गांधी हा मूळचा बिलासपूर येथील रहिवासी आहे. संजय गांधीनगर परिसर छत्तीसगडी मजुरांची वस्ती आहे. या ठिकाणी अंधश्रद्धेचा बोलबाला आहे.
येथील बहुतांश लोक डॉक्टरांऐवजी मांत्रिकांवर विश्वास ठेवतात. त्याच्या घरी अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी महिलांची बरीच गर्दी असते. तो येणाऱ्या महिलांकडून कमीतकमी ५०० रुपये शुल्क घेतो. त्याशिवाय अंगारा घेण्यासाठी ११ रुपये घेतले जात होते. गांधीकडे दररोज किमान ८ ते १० महिला येत होत्या. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ए.जे. रामटेके करीत आहेत. (प्रतिनिधी)
चेहरा पाहून सांगितले भविष्य
तक्रारकर्त्या महिलेला दोन मुलं आहेत. आरोपीने तिला पाहून निपुत्रिक असल्याचे भविष्य सांगितले होते. अज्ञातस्थळी गेल्यास सर्वकाही ठीक होईल, असे मांत्रिकाचे म्हणणे होते. पहिल्यांदा यश न मिळाल्यास दोन-चार चकरा माराव्या लागतील, असेही त्याचे म्हणणे होते.