पर्यावरण करानंतरही प्रदूषणाची समस्या कायम
By Admin | Updated: October 28, 2014 00:23 IST2014-10-28T00:23:42+5:302014-10-28T00:23:42+5:30
वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लावला. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व पूर्वने आतापर्यंत पाच कोटींच्यावर कर संकलित केला.

पर्यावरण करानंतरही प्रदूषणाची समस्या कायम
पाच लाखांवर वाहनांचा धूर : करातील एकही पैसा प्रदूषणावर खर्च नाही
नागपूर : वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लावला. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व पूर्वने आतापर्यंत पाच कोटींच्यावर कर संकलित केला. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने निदर्शित केलेल्या विविध पद्धतींवर हा कर खर्च होणार होता, परंतु चार वर्षे झालीत, यातील एक नवा रुपया खर्च झालेला नाही. पर्यावरण कर लावण्याचा उद्देशही सफल झालेला नाही.
उपराजधानीत रोज पाच लाखांच्यावर वाहने धूर सोडत धावतात. नागरिकांचा जीव गुदमरत आहे. धूर ओकणाऱ्या या वाहनांमुळे प्रदूषणासोबतच आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात सर्वात जास्त लहान मुले बळी पडत आहेत. अस्थामासारख्या गंभीर आजाराच्या विळख्यात ती सापडत असल्याचे, डॉक्टरांचे म्हणने आहे. दुसरीकडे या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून फारसा महसूल गोळा नसल्याने आरटीओ व वाहतूक विभागाचे याकडे फारसे लक्ष नाही. शहरात विविध प्रकारची १४ लाखांवर वाहने आहेत. यात पेट्रोलची बहुसंख्य वाहने सोडल्यास डिझेलवर चालणारी विशेषत: शासकीय वाहने सर्वच धूर सोडत धावतात. याशिवाय कालबाह्य झालेल्या अनेक दुचाकी, कार्स, जीप, मॅटाडोर, सहासिटर, ट्रॅक्सचा मोठा धूर सोडत असल्याने प्रदूषणाची समस्या गंभीर बनू पाहत आहे. (प्रतिनिधी)