दिवाळीनंतर ‘स्थानिक स्वराज्य’चे फटाके
By Admin | Updated: November 11, 2015 02:09 IST2015-11-11T02:09:55+5:302015-11-11T02:09:55+5:30
दिवाळीचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली असली तरी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीचे फटाके हिवाळी अधिवेशन काळात फुटणार आहेत.

दिवाळीनंतर ‘स्थानिक स्वराज्य’चे फटाके
मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची जागा : भाजपमध्ये मानकर, दटके, जोशी, व्यास चर्चेत
लोकमत विशेष
कमलेश वानखेडे नागपूर
दिवाळीचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली असली तरी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीचे फटाके हिवाळी अधिवेशन काळात फुटणार आहेत. दिवाळीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांनी आतापासून मतदारांशी संपर्क साधून अॅडव्हान्समध्ये ‘शुभेच्छा’ देण्यासही सुरुवात केली आहे. बिहार निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात होत असलेली ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजप व काँग्रेसच्या मतांमध्ये बराच फरक आहे. मात्र, शिवसेनेची भूमिका, अंतर्गत मतभेद व इच्छुकांची मोठी यादी यामुळे भाजपकडून सावध पावले टाकली जात आहेत.१८ ते २१ डिसेंबरदरम्यान ही निवडणूक होण्याची तर २० ते २५ नोव्हेंबरदरम्यान निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन असल्यामुळे संपूर्ण सरकार नागपुरात डेरेदाखल असेल. अधिवेशनाचा चढता रंग अन् डिसेंबरच्या वाढत्या थंडीत नागपुरात राजकीय पारा चढणार आहे. वर्षपूर्ती करणाऱ्या फडणवीस सरकारला फटाके फोडण्याची संधी मिळते की सरकारलाच ‘फटाके’ लागतात हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या नागपूरची जागा काँग्रेसचे आ. राजेंद्र मुळक यांच्या ताब्यात आहे. मात्र, केंद्र व राज्यात असलेली सत्ता, महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदेतील संख्या बळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांवर ‘वचक’ निर्माण करून ही निवडणूक जिंकण्याची तयारी भाजपने चालविली आहे. आता महापालिका, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. शिवाय पंचायत समिती व नगर परिषदांमध्येही दबदबा आहे. मात्र, भाजप- शिवसेना विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढून सत्तास्थापनेसाठी एकत्र आले. कल्याण- डोंबीवली महापालिकेच्या निवडणुकीत जोरात चिखलफेक झाली.
मात्र, तेथेही सत्तास्थापनेसाठी भाजप- सेना एकत्र संसार करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शब्द टाकला व शिवसेनेने तो राखला तर मात्र, भाजप ही निवडणूक एकतर्फी जिंकेल, अशी स्थिती आहे. मात्र, या निवडणुकीत काहीही खेळ होऊ शकतो, हे गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी दाखवून दिले आहे.
ंकाँग्रेस मारणार का ‘गट’बाजी ?
राजेंद्र मुळक इच्छुक : वडेट्टीवार समिती घेणार १७ ला बैठक
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी विद्यमान आ. राजेंद्र मुळक यांच्याशिवाय दुसरे नाव सध्यातरी चर्चेत नाही. मुळक यांचे तिकीट कापण्यासाठी काही नेत्यांची पडद्यामागून फिल्डिंगही सुरू आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी इच्छुक असल्याची पक्षात चर्चा होती. मात्र, त्यास दुजोरा मिळाला नाही. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात होत असलेली ही निवडणूक जिंकून राज्याला संदेश देण्याची संधी काँग्रेसकडे आहे. मात्र, गटातटात विखुरलेली काँग्रेस हा मोठा अडथळा आहे. या निवडणुकीत गटबाजी काँग्रेसला मारणार की काँग्रेस बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
समन्वयातून उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार व प्रदेश सचिव वजाहत मिर्झा यांची समिती नेमली आहे. ही समिती १७ नोव्हेंबर रोजी रविभवन येथे शहर व जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची मते जाणून घेणार आहे. या बैठकीला माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. वडेट्टीवार समिती नेत्यांशी चर्चा करून आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांना सोपविणार आहे. काँग्रेस नेते वरवर एकसंघ असल्याचे दाखवित असले तरी प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच आहे. आघाडी सरकारमध्ये मुळक राज्यमंत्री होते.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी असलेली जवळीक काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना खटकत होती. त्यामुळे आता मुळक यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी हे नेते कितपत साथ देतील, हा देखील मोठा प्रश्न आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यासाठी नागपुरात आले असता चव्हाण यांनी ही निवडणूक उमेदवार नाही तर ‘काँग्रेस’ लढविणार आहे, असे सांगत सर्वांना एकजुटीने काम करावेच लागेल, असे बजावले आहे. ही निवडणूक जिंकून राज्यात एक वेगळा संदेश देण्याची तयारी चव्हाण यांनी चालविली आहे. (प्रतिनिधी)