पराजयानंतर आता ‘जय’चा शोध !
By Admin | Updated: September 26, 2016 03:03 IST2016-09-26T03:03:57+5:302016-09-26T03:03:57+5:30
मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी नागपूर वन विभागाने पुन्हा कंबर कसली आहे.

पराजयानंतर आता ‘जय’चा शोध !
वन विभागाचा स्पेशल ड्राईव्ह : ‘जय’चे छायाचित्र जारी
नागपूर : मागील चार महिन्यांपासून गायब असलेल्या ‘जय’ च्या शोधासाठी नागपूर वन विभागाने पुन्हा कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील तीन दिवस ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविला जाणार आहे. माहिती सूत्रानुसार नागपूर वन विभागाची फौज या ड्राईव्हसाठी सज्ज झाली आहे. शिवाय वन्यजीव विभागाने या अभियानातील प्रत्येक वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘जय’ ची ओळख व्हावी, यासाठी ‘जय’ चे दोन छायाचित्र जारी केले आहे. सोबतच पुढील तीन दिवस ‘जय’ च्या शोधासाठी जंगलात पायदळ पेट्रोलिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार उद्या (सोमवार) पासून या अभियानाला सुरुवात होत आहे. यात नागपूर वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर वनमजुरापर्यंतचा प्रत्येक कर्मचारी सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, नागपूर वन विभागाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या वाघासाठी अशाप्रकारचा ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबविला जात असल्याची माहिती आहे. ‘जय’ मुळे संपूर्ण वन विभाग अस्वस्थ झाला आहे. यात वन्यजीव विभागातील काही अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांच्या मते, वन विभागाची ही धडपड केवळ औपचारिकता आहे. ‘जय’ सारखा वाघ चार महिने कधीच गप्प बसू शकत नाही. तो जंगलातील वन्यप्राण्यांची शिकार करण्याऐवजी पाळीवप्राण्यांना अधिक लक्ष्य करीत होता. असे असताना मागील चार महिन्यात त्याने एकाही पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याची घटना पुढे आलेली नाही. त्यामुळे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी वन विभागातील काही अधिकारी सुद्धा दबक्या आवाजात ते मान्य करीत आहे. परंतु प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, कुणीही स्पष्ट बोलण्याचे धाडस करीत नाही.
मात्र वन्यजीव क्षेत्रातील बहुतांश तज्ज्ञ आणि वन अधिकाऱ्यांकडून ‘जय’ जिवंत राहिला नाही. असेच संकेत मिळत आहे. त्यामुळे वन विभाग गाजावाजा करीत असलेल्या या ‘स्पेशल ड्राईव्ह’ वर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (प्रतिनिधी)
...ही केवळ सारवासारव
माहिती सूत्रानुसार ‘जय’ प्रकरणी नागपूर वन विभागाला प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. शिवाय पुढील १ आॅक्टोबरपासून वन्यजीव सप्ताह सुरू होत आहे. या उत्सवावर निश्चितच ‘जय’ चे सावट राहणार आहे. त्यामुळे नागपूर वन्यजीव विभागाची ही केवळ सारवासारव असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक सध्या संपूर्ण विदर्भात धो-धो पाऊस सुरू आहे. शिवाय संपूर्ण जंगल हिरवेगार झाले आहे. अशा स्थितीत वन अधिकारी आणि कर्मचारी घनदाट जंगलात पायी फिरून खरंच ‘जय’ चा शोध घेणार का, असा या निमित्ताने सवाल उपस्थित केला जात आहे.