पराभवानंतर काँग्रेसमध्ये गटबाजीचे चक्रीवादळ
By Admin | Updated: March 2, 2017 02:25 IST2017-03-02T02:25:36+5:302017-03-02T02:25:36+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता अंतर्गत गटबाजीचे चक्रीवादळ उठले आहे.

पराभवानंतर काँग्रेसमध्ये गटबाजीचे चक्रीवादळ
राऊत व मुत्तेमवार- ठाकरे समर्थक आमने सामने : एकमेकांविरोधात मोर्चेबांधणी
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता अंतर्गत गटबाजीचे चक्रीवादळ उठले आहे. समर्थकांना हाताशी धरून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसचा गड असलेल्या उत्तर नागपुरात भाजपाने घवघवीत यश मिळविले. मुत्तेमवार- ठाकरे समर्थकांनी याचे खापर माजी मंत्री नितीन राऊत यांच्यावर फोडले असून राऊत यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली आहे तर, राऊत समर्थकांनी माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत यांच्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप केला आहे.
नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व उत्तर नागपूरचे प्रभारी बंडोपंत टेंभुर्णे, धरमकुमार पाटील, सुरज आवळे, मीना यादव, अन्सारी साहिना अंजू, अतिक मलिक, अंबादास गोंडाणे, मालिनी खोब्रागडे, बाबी दहिवले, नितीन इंदूरकर, प्रीती भाल, अनिता फ्रान्सिस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्यावर तोफ डागली. राऊत यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. पक्षविरोधी कारवाई केली, असा आरोप करीत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी केली. धरमकुमार पाटील यांनी सांगितले की, राऊत यांनी मर्जीतील उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे अधिकृत उमेदवारांना पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे केले.
प्रभाग ६ मध्ये अपक्ष उमेदवार निरंजनकुमार रामटेके यांच्या बॅनरवर राऊत यांचा फोटो होता. शिवाय त्यांच्या प्रचार गाड्यांवरही राऊत यांनी स्वत:चा फोटो लावून प्रचार केला. राऊत यांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात गुप्त बैठका घेतल्या. याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे राऊत समर्थक महामंत्री संजय दुबे, ठाकूर जग्यासी, एस.एस. पाटील, आर.जी. राणा, दिलीप घोरपडे, विजय तेलंग, डॉ. निशिकांत मोरे, नीरज चौबे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करीत विलास मुत्तेमवार व विकास ठाकरे यांना लक्ष्य केले. मुत्तेमवार-ठाकरे यांनी उमेदवारांची एकतर्फी निवड केली. दिखाव्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन दोन-तीन लोकांनीच उमेदवारांचे नाव निश्चित केले. २२ जागांवर डबल ए-बी फॉर्म वितरित करण्यात आले.