मुलाच्या मृत्यूनंतरही अस्तित्व कायम
By Admin | Updated: August 6, 2015 02:32 IST2015-08-06T02:32:02+5:302015-08-06T02:32:02+5:30
होळीचा आनंदाचा सण. त्याच दिवशी तो मोटारसायकलवरून खाली पडला. डोक्याला जबर मार लागला. त्याला लागलीच इस्पितळात भरती केले.

मुलाच्या मृत्यूनंतरही अस्तित्व कायम
उपराजधानीत पहिल्या ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवाचे प्रत्यारोपण
वडिलांनी केले मुलाचे अवयव दान : दोघांना मिळाले जीवनदान तर दोघांना दृष्टी
सुमेध वाघमारे नागपूर
होळीचा आनंदाचा सण. त्याच दिवशी तो मोटारसायकलवरून खाली पडला. डोक्याला जबर मार लागला. त्याला लागलीच इस्पितळात भरती केले. सात दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मुलगा बरा होईल, या आशेवर आई-वडील होते. परंतु आठव्या दिवशी डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केले. आईचा आक्रोश थांबत नव्हता. वडिलांचाही धीर खचला होता. आपला मुलगा गेला असला तरी त्याचे अस्तित्व कायम ठेवू शकतो ही जाणीव त्या दु:खातही त्यांना झाली. स्वत:ला सावरत त्यांनी निर्णय घेतला तो मुलाचे अवयवदान करण्याचा. त्यांच्या या निर्णयामुळे दोघांना जीवनदान तर दोघांना नवी दृष्टी मिळाली. आज त्यांचा मुलगा जगात नसला तरी त्याच्या डोळ्यांतून सृष्टी अनुवभतो आहे याचे समाधान या दांपत्याला आहे. विशेष म्हणजे ‘ब्रेनडेड’ दात्याच्या अवयव प्रत्यारोपणाचे हे नागपुरातील पहिलेच प्रकरण होते.
एअर डिफेन्स रेजिमेन्टचे निवृत्त हवालदार संजयकुमार आणि आरती सिंग यांचा १८ वर्षीय मुलगा अमित हा २७ मार्च २०१३ होळीच्या दिवशी मित्रांना भेटायला मोटरसायकलने निघाला. मात्र, काही वेळातच त्याला अपघात झाल्याचा निरोप आला. त्याला लागलीच जवळच्या इस्पितळात आणि नंतर छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने आणि डोक्याला जबर मार लागल्याने तेथून त्याला नागपुरातील एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेने सर्वच हादरून गेले होते. बेशुद्ध अवस्थेत त्याच्यावर सात दिवस उपचार चाललेत. तो बरा होईल या आशेवर आई-वडील होते. परंतु आठव्या दिवशी डॉक्टरांनी मेंदूत रक्तस्राव झाल्याचे सांगून ‘ब्रेनडेड’ घोषित केले. त्याच्या सर्व अवयवांचे कार्य सुरू होते. व्हेंटिलेटरवर आणखी काही दिवस ठेवून पाहता येईल, असेही डॉक्टरांचे म्हणणे होते.
या धक्क्यातून सावरत वडिलांनी खचून न जानता संयमतेने अवयवदानाचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय अमितच्या आईला सांगतांना त्यांना मनाची खूप तयारी करावी लागली. पण ती माताही समजली. मुलाची किडनी, डोळे या अवयवाचे दान करायास तिने होकार दिला. या निर्णयाने त्या दाम्पत्याने एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला. दुसऱ्याच दिवशी अमितच्या किडनी अत्यंत गरजू असलेल्या एका २० वर्षीय मुस्लीम मुलीला आणि एका पोलिसाला देण्यात आल्या. तर इतर दोघांना नेत्रदान करून त्यांना नवी दृष्टी दिली.
समाजाने घ्यावी प्रेरणा
स्वत:च्या मुलाच्या मृत्यूचे दु:ख विसरून इतरांना नवे आयुष्य देणारा निर्णय घेणे सोपे नव्हते. परंतु या दाम्पत्याने आपल्या कार्यातून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला. त्यांच्या या कार्याची प्रेरणा इतरांना मिळावी म्हणून जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यात ११८ बटालियन आर्मी येथे मोहन फाऊंडेशनच्या सहकार्याने या दाम्पत्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता. हो सोहळा मोहन फाऊंडेशनचे नागपूरचे संचालक डॉ. रवी वानखेडे यांनी घडवून आणला होता.