अखेर ब र स ला ....
By Admin | Updated: June 18, 2016 02:15 IST2016-06-18T02:15:36+5:302016-06-18T02:15:36+5:30
उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे ४४ अंशावर पोहोचलेला पारा खाली घसरला.

अखेर ब र स ला ....
नागपूर : उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे ४४ अंशावर पोहोचलेला पारा खाली घसरला. मात्र वादळाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची पडझड झाली. झिंगाबाई टाकळी परिसरातील इंदिरामाता नगर येथे आठ ते दहा घरांचे छत उडाले. दरम्यान अनेक फिडरवर बे्रकडाऊन झाल्यामुळे अर्ध्यां नागपुरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
मागील काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी मान्सूनपूर्व पाऊस बरसला. सायंकाळी उपराजधानीसह संपूर्ण जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यात रात्री ८.३० वाजतापर्यंत नागपुरात २० मिमी. पावसाची नोंद झाली. या पावसाने शेतकरी सुखावला असून, आता लगेच पेरण्यांना सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, हवामान विभागाने पुढील २० जूनपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची शुक्रवारपासूनच सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले होते. यात दुपारी २ वाजताच्या सुमारास शहरातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र काहीच वेळात त्यात खंड पडला. यानंतर सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दरम्यान नागपूर शहरासह नरखेड तालुक्यातील जलालखेडा, मोवाड, सावरगाव, भिष्णूर परिसरातही चांगलाच पाऊस बरसला. तसेच काटोल व कळमेश्वर तालुक्यातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पारशिवनी तालुक्यात दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दरम्यान आलेल्या वादळाने काही गावांतील घरांचे छत उडाल्याच्या घटना पुढे आल्या. तसेच काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. (प्रतिनिधी)
१४ फिडरवर ब्रेकडाऊन
सायंकाळी आलेल्या वादळी पावसात स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) १४ फिडरवर ब्रेकडाऊन झाल्याने अर्ध्यां नागपुरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर एसएनडीएलच्या पथकाने काही भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्यांना रात्री उशिरापर्यंत फे्रन्डस कॉलनी व सिव्हिल लाईन्स परिसरातील डब्ल्यूसीएल फिडरवरील वीज पुरवठा सुरू करण्यात यश मिळाले नव्हते. यामुळे गिट्टीखदान, बोरगाव, गोरेवाडा, अनंतनगर, पटेलनगर, एकतानगर, बर्डे ले-आऊट, आकारनगर, प्रेरणा कॉलनी, आदिवासी कॉलनी, नर्मदा कॉलनी व वीरचक्र कॉलनी या भागातील नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला.
घरावरील छत उडाले
वादळी पावसात झिंगाबाई टाकळी फरस येथील इंदिरामाता नगर येथील आठ ते दहा घरांचे छत उडाले. तसेच दोन घरांच्या भिंती पडल्याच्या घटना पुढे आल्या. याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडेसुद्धा कोसळली. यात काही झाडे विजांच्या तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. अशातच काटोल रोडवरील एसएनडीएलच्या एका फिडरवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले.