वर्षभरानंतर मिळाला विदर्भ वैधानिक मंडळाला सदस्य सचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 21:24 IST2022-11-29T21:22:58+5:302022-11-29T21:24:25+5:30
Nagpur News शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

वर्षभरानंतर मिळाला विदर्भ वैधानिक मंडळाला सदस्य सचिव
नागपूर : विदर्भ वैधानिक विकास मंडळाला अखेर वर्षभरानंतर प्रमुख मिळाला आहे. मंगळवारी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांची मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. यासोबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी वा अधिवेशन कालावधीत मंडळाला पुनर्जीवन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे संविधानाच्या कलम ३७१ (२)अंतर्गत गठित करण्यात आलेल्या विदर्भासह राज्यातील तीन विकास मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आला. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंडळांना मुदतवाढ देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. शिंदे- फडणवीस सरकारने पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेत राज्यपालांकडे शिफारस केली. राजभवनाने प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.
दरम्यान, ऑगस्ट २०२१ मध्ये गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांची बदली झाली. तेव्हापासून मंडळाचे सचिवपद रिक्त होते. सूत्रांच्या माहितीनुसार मंडळाचे पुनर्जीवन करण्याच्यादृष्टीने सरकारने मंडळाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.