नऊ दिवसानंतर संघाने व्यक्त केला शोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:49 IST2017-07-20T01:49:52+5:302017-07-20T01:49:52+5:30

अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

After 9 days, the team expressed their condolences | नऊ दिवसानंतर संघाने व्यक्त केला शोक

नऊ दिवसानंतर संघाने व्यक्त केला शोक

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला :
ना कुठली मागणी, ना कुठला संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. एकीकडे विश्व हिंदू परिषदेने या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र मौन राखले होते. अखेर हल्ल्याला ९ दिवस उलटून गेल्यानंतर संघाने शोक व्यक्त केला. मात्र यावेळी कुठलाही संताप किंवा कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी भाषा टाळण्यात आली आहे. संघाच्या या भूमिकेवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
१० जुलै रोजी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात एकूण आठ नागरिकांचा जीव गेला होता. देशभरातील विविध संघटनांनी याबाबत निषेधाचा सूर लावला. विश्व हिंदू परिषदेने तर यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकेची तोफ डागली. संघातर्फे मात्र १८ जुलै रोजी याबाबत शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांचे वक्तव्य संघातर्फे जारी करण्यात आले. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा वर्षानुवर्षे निरंतर सुरू आहे. दरवर्षी यात्रेकरूंची संख्या वाढत आहे. यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला होणे तसेच बस दरीत कोसळून भक्तांचा जीव जाणे या दुर्दैवी घटना आहेत. संघ या यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. मरण पावलेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबीयांप्रति शोक व सांत्वना व्यक्त करतो, असे डॉ. वैद्य यांनी जारी केलेल्या वक्तव्यात नमूद आहे.
संघाने याअगोदर झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी कडक शब्दात निंदा केली आहे तसेच दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची भाषादेखील बोलण्यात आली आहे. मात्र आता केंद्रात संघ परिवाराची सत्ता आहे. अशास्थितीत संघाने अतिशय मवाळ भाषेत भावना व्यक्त केल्या असून, केंद्र किंवा प्रशासनावर टीका तसेच कारवाईची भाषा टाळली आहे.

Web Title: After 9 days, the team expressed their condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.