वकिलांनी पारदर्शकपणे बाजू मांडावी
By Admin | Updated: February 6, 2015 00:59 IST2015-02-06T00:59:08+5:302015-02-06T00:59:08+5:30
वकिली व्यवसायात नव्याने आलेल्या तरुणांनी सखोल अभ्यास आणि पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. आपली बाजू मांडताना कुठल्याही विशिष्ट पद्धतीचा उपयोग न करता सोप्या

वकिलांनी पारदर्शकपणे बाजू मांडावी
सुनील मनोहर: विधी महाविद्यालयाच्या ‘जस्टा कॉजा’चे उद्घाटन
नागपूर : वकिली व्यवसायात नव्याने आलेल्या तरुणांनी सखोल अभ्यास आणि पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. आपली बाजू मांडताना कुठल्याही विशिष्ट पद्धतीचा उपयोग न करता सोप्या पद्धतीने बाजू मांडावी. महत्त्वाचे म्हणजे बाजू मांडताना त्यात पारदर्शकता असावी, असे मत राज्याचे महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘जस्टा कॉजा’ या विधी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गुरुवारी सायंकाळी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाच्या नागपूर विद्यापीठाच्या ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार उपस्थित होते. तर पदव्युत्तर विधी विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. विधी शाखेतून वकिली व्यवसायात प्रवेश करताना कठोर परिश्रम आवश्यक आहेत. यशासाठी कुठल्याही शॉर्टकटचा वापर करू नका, असा सल्ला मनोहर यांनी यावेळी दिला.
जुन्या वकिलांमध्ये इंग्रजी भाषेप्रमाणेच प्रादेशिक भाषेवरही प्रभुत्व दिसून यायचे. परंतु आताच्या काळात केवळ इंग्रजीच चांगले असते. त्यामुळे नवीन वकिलांसमोर प्रादेशिक भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन डॉ. देशपांडे यांनी केले.
विधी पदवी मिळाल्यानंतर वकिली करण्याऐवजी कॉर्पोरेट क्षेत्रात सल्लागार म्हणून जाण्याकडे कल दिसून येत आहे. शिक्षणात स्थानिक कायद्यांना स्थान देणे अपेक्षित आहे. तसेच प्रकरणाचा ‘ड्राफ्ट’ तयार करण्यासंदर्भात विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेदेखील ते म्हणाले.
विधी महाविद्यालयांकडे काही प्रमाणात नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळे लॉ युनिव्हर्सिटी आणि जिल्हास्तरावर ‘मॉडेल लॉ कॉलेज’ची निर्मिती करण्याची गरज असून यासंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॉ. कोमावार यांनी सुनील मनोहर यांना केली. शिक्षण संस्थांची संख्या वाढते आहे, मात्र दर्जा सुमार होतो आहे याबद्दल कोमावार यांनी खंत व्यक्त केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन पॅमेला डिसूझा आणि गौरी पुरोहित यांनी केले तर राजसी मार्डीकरने आभार मानले.
‘जस्टा कॉजा’मध्ये विविध शहरांतील विधी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय विधी सेमिनारचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ‘मूट कोट’ स्पर्धा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)