नागपुरातील बहुचर्चित वकील अ‍ॅड. सतीश उके यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:29 IST2018-07-31T22:02:31+5:302018-08-01T01:29:45+5:30

येथील बहुचर्चित वकील अ‍ॅड. सतीश उके यांना जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Advocate Satish Uke in Nagpur arrested | नागपुरातील बहुचर्चित वकील अ‍ॅड. सतीश उके यांना अटक

नागपुरातील बहुचर्चित वकील अ‍ॅड. सतीश उके यांना अटक

ठळक मुद्देजमिनीचे फसवणूक प्रकरण : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील बहुचर्चित वकील अ‍ॅड. सतीश उके यांना जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात  चर्चेला उधाण आले आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर वर्टीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभाराणी राजेंद्र नाकाडे (वय ६०, रा. पोलीस लाईन टाकळी) यांनी गेल्या वर्षी अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार, नाकाडे यांच्या नातेवाईकांची मौजा बाबुळगाव परिसरातील खसरा क्रमांक ८२/ २ ची दीड एकर जमीन होती. या जमिनीचे आममुख्त्यार पत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन अ‍ॅड. उके यांनी दुसऱ्यांना विकल्याचा आरोप नाकाडे यांनी तक्रारीतून केला होता. त्याची तक्रार अजनी ठाण्यात गेल्या वर्षी करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये हे प्रकरण गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी सोपविण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वर्टीकर यांनी या प्रकरणाची अडीच महिने चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी अ‍ॅड. उके यांना चौकशीसाठी गुन्हे शाखा कार्यालयात बोलविले. सायंकाळपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १२०, ४२०, ४२३, ४२४, ४४७, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ अन्वये गुन्हा दाखल करून अ‍ॅड. उके यांना अटक केली.
१७ वर्षांपूर्वीचे प्रकरण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण १७ वर्षांपूर्वीचे आहे. नाकाडे यांच्याकडून ही जमीन १९९१ मध्ये ऐश्वर्य गृहनिर्माण सोसायटीला ही जमीन विकण्यात आली होती. १० वर्षांनंतर अ‍ॅड. उके यांनी आममुख्त्यारपत्राचा (पॉवर आॅफ अटर्नी) वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही जमीन त्यांनी दुसऱ्यांना विकून टाकली,असा आरोप आहे. या प्रकरणाला १७ वर्षे झाली असताना वर्षभरापूर्वी त्याची तक्रार नाकाडे यांनी केली. त्यानुसार, मंगळवारी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी उके यांना अटक केली.

पाच कोटींची जमीन, उकेंच्या भावासह एकूण तीन आरोपी 
या प्रकरणात पोलिसांनी अ‍ॅड. उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीप महादेवराव उके आणि चंद्रशेखर नामदेवराव मते (रा. पार्वतीनगर) यांनाही आरोपी बनविले आहे. या तिघांनी संगनमत करून जमिनीच्या सातबारावर नोंद असलेल्या मालकाला रीतसर नोटीस न देता अथवा संपर्क न करता सोसायटीची दीड एकर जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या जमिनीची किंमत पाच कोटी रुपये असल्याचे पोलीस सांगतात. 

Web Title: Advocate Satish Uke in Nagpur arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.