मेहंदीबाग भुयारी मार्गासाठी सल्लागार
By Admin | Updated: April 10, 2015 02:15 IST2015-04-10T02:15:51+5:302015-04-10T02:15:51+5:30
मेहंदीबाग भुयारी मार्गावर(आरयूबी) साचणाऱ्या घाण पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्त केला आहे.

मेहंदीबाग भुयारी मार्गासाठी सल्लागार
नागपूर : मेहंदीबाग भुयारी मार्गावर(आरयूबी) साचणाऱ्या घाण पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्त केला आहे. वाहतुकीची सुविधा आणि त्याचा उपयोग वाढावा, यासाठी हे काम हाती घेण्यात येत आहे.
मेहंदीबाग आरयूबीमध्ये पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार केला जाणार असून, रस्त्याची उंचीही वाढविण्यात येणार आहे. रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या कामाच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण यापूर्वी पाणी काढण्यासाठी महापालिकेने पंप लावले होते; मात्र त्याचा उपयोग झाला नव्हता. आरयूबीचा उपयोगही अपेक्षेप्रमाणे होत नाही. कमाल टॉकीज चौक व पाचपावलीकडून पुलाकडे येताना आणि जाताना फेरा पडणे हे यामागचे कारण आहे. याबाबत येणाऱ्या अडचणी तांत्रिक आणि योग्य पद्धतीने सोडवता याव्यात म्हणून महापालिकेने व्हीएनआयटीची मदत घेतली होती. व्हीएनआयटीने सर्वेक्षण करून एक अहवाल फेब्रुवारी २०१५ मध्ये महापालिकेला सादर केला होता.
मेहंदीबाग आरयूबी परिसरात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येवरून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त करण्यात आली. या समितीची १२ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. यात समस्या सोडवण्याच्या विषयांवर चर्चा झाली.
दरम्यान, सध्या तरी व्हीएनआयटीने केलेले सर्वेक्षण आणि सूचनांची दखल घेण्यात आली नाही. त्यांनी सुचविलेले उपाय दीर्घकालीन लाभ देणारे असले तरी ते खर्चिक आहेत आणि ही बाब व्हीएनआयटीनेसुद्धा मान्य केली आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)