जाहिरात निविदेचा इतिहास
By Admin | Updated: February 5, 2015 01:11 IST2015-02-05T01:11:29+5:302015-02-05T01:11:29+5:30
गेल्या १५ वर्षांत विमानतळावर जाहिरात लावण्याची निविदा फक्त तीनदा बोलविली. या प्रक्रियेत सहभागी होणारी कार्टेल ही एकमेव कंपनी आहे. २००९ पर्यंत भारतीय विमानतळ

जाहिरात निविदेचा इतिहास
कार्टेल तुपाशी एमआयएल उपाशी!
नागपूर : गेल्या १५ वर्षांत विमानतळावर जाहिरात लावण्याची निविदा फक्त तीनदा बोलविली. या प्रक्रियेत सहभागी होणारी कार्टेल ही एकमेव कंपनी आहे. २००९ पर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) या कंपनीने निविदा बोलविली. २००९ मध्ये विमानतळाचे संचालन एमआयएलकडे आले. तेव्हापासून कंपनी निविदा बोलवित आहे. एमआयएलने २०१२ मध्ये दरमहा १४.९० लाख रुपये नमूद असलेली निविदा बोलविली. पण, या प्रक्रियेत कुणीही सहभागी झाले नाही. या कामासाठी फेरनिविदा बोलविल्यानंतर पहिली अॅडमार्क आणि दुसरी कार्टेलने निविदा भरली. पण कुठलेही कारण न देता अॅडमार्कने या प्रक्रियेतून माघार घेतली. पुन्हा झालेल्या फेरनिविदेत फक्त कार्टेल कंपनीची निविदा होती. तिसऱ्या फेरनिविदेनुसार एमआयएने विमानतळावर जाहिरात लावण्याचे कंत्राट दरमहा १२.५० लाख रुपये दराने कार्टेलला दिले.
अशी आह कार्टेलची भूमिका
या प्रकरणी कार्टेलचे प्रमोटर श्रीपाद आष्टेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कार्टेलने चुकीचे काहीही केलेले नाही, असे सांगितले. पहिले असे की निविदा प्रक्रियेत केवळ आम्ही होतो तर दुसरे असे की कोणताही अनौपचारिक करार केला नाही आणि तिसरे असे की, कार्टेलने एकाधिकारशाही तयार केली नाही. मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील जीएमआर आणि जीव्हीके या खासगी कंपन्यांनाही दीर्घकालीन कंत्राट देण्यात आले आहे, शिवाय प्रो-डाटा रेटवर नवीन जागेवर जाहिरात लावण्यास परवानगी दिली आहे. एमआयएलनेही याच मार्गाचा अवलंब केल्याचे ते म्हणाले. गेल्यावेळी अॅडमार्कने निविदा मागे घेतली नव्हती, तर त्यांचा प्रतिनिधी उशिरा पोहोचल्याने ते प्रक्रियेत अपात्र ठरले होते. नागपूर विमानतळाच्या कंत्राटात कार्टेलला तोटा झाल्याचा दावा आष्टेकर यांनी केला, पण लाखो रुपयांच्या प्रश्नांवर आष्टेकर यांनी काहीच उत्तर दिले नाही. या कंत्राटात कार्टेलला तोटा होत असेल तर हे काम ते का सोडत नाही, शिवाय कंपनी नागपूर विमानतळावर पायाभूत सुविधेसाठी पैसा का खर्च करीत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. यावर त्यांनी ही अंतर्गत बाब असल्याचे सांगून चुप्पी साधली. विमानतळावरील जाहिरातीच्या कंत्राटात काहीच आलबेल नसल्याचे कार्टेलने दिलेल्या अस्पष्ट स्पष्टीकरणाने दिसून येते. (विशेष प्रतिनिधी)
एमआयएल काय म्हणते
२०१२ मध्ये निविदा बोलविल्या तेव्हा अनिलकुमार हे एमआयएलचे संचालक होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी पद सोडले आहे. या पदाचा कार्यभार अवधेश प्रसाद यांनी पाच दिवसांआधी स्वीकारला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जाहिरातींच्या बोर्डाचे आकार आणि संख्या वाढल्याचे मान्य केले. एमआयएलने चुकीचे काहीही केले नाही. ही प्रक्रिया सर्व नियमानुसारच झाली आहे. अशा प्रक्रियेमुळे तुमचे महसुली उत्पन्न कमी झाले नाही का, या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. या कंत्राटाची मुदत जेव्हा संपेल तेव्हा एमआयएलतर्फे नव्याने फ्रेश निविदा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.