‘बीएस्सी’नंतर घेता येणार अभियांत्रिकी द्वितीय वर्षाला प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:41+5:302021-02-05T04:44:41+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात व एकूण प्रक्रियेत मोठे बदल ...

‘बीएस्सी’नंतर घेता येणार अभियांत्रिकी द्वितीय वर्षाला प्रवेश
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात व एकूण प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहे. बारावीत कमी गुण मिळाल्यामुळे अनेक जण नाईलाजाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतात. मात्र अशा विद्यार्थ्यांचेदेखील अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. ‘बीएस्सी’ झाल्यानंतरदेखील आता थेट अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने दिशानिर्देशदेखील जारी केले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पदवी प्रणालीतदेखील बदल करण्याच्या मुद्दयांचा अंतर्भाव आहे. त्याचाच आधार घेत नागपूर विद्यापीठात यासंदर्भात बदल करण्याची सुरुवात झाली आहे. याअंतर्गतच हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. याअगोदर तंत्रनिकेतन पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळायचा. आता त्यात ‘बीएस्सी’ पदवीधारकांनादेखील संधी देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा
पदविका अभ्यासक्रमातून द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘सीजीपीए’ त्याच वर्षीपासून ग्राह्य धरण्यात येतील. त्यांना प्रथम वर्षाच्या कुठल्याही विषयाची परीक्षा देण्याची गरज नसेल. मात्र ‘बीएस्सी’ करून मग द्वितीय वर्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील ‘इंजिनिअरिंग ग्राफिक्स-१’, ‘बेसिक्स ऑफ सिव्हील अॅन्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग’, ‘बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’, ‘कॉम्प्युटेशनल स्कील्स’, ‘इंजिनिअरिंग मेकॅनिक्स’ यापैकी अभ्यासक्रमनिहाय विषयांची परीक्षा द्यावी लागेल.
पदवीचे प्रारूप बदलणार
नवीन बॅचपासून पदवीचे प्रारूपदेखील बदलणार आहे. ‘डिग्री विथ मायनर’, ‘डिग्री विथ मेजर’ व ‘डिग्री विथ ऑनर्स’ यापैकी एक पदवी मिळणार आहेत. ‘ऑनलाइन’ माध्यमातून १८ ते २० अतिरिक्त ‘क्रेडिट्स’ मिळविल्यानंतर ‘डिग्री विथ मायनर’ अथवा ‘डिग्री विथ मेजर’ मिळू शकेल. संबंधित शाखांचा यामाध्यमातून अतिरिक्त अभ्यास करता येईल.
अशा असणार अभियांत्रिकीच्या पदवी
डिग्री विथ मायनर:चार वर्षीय अभ्यासक्रमासह इतर विद्याशाखेतील १८ ते २० ‘क्रेडीट्स’ मिळविण्यानंतर
डिग्री विथ मेजर:त्याच अभ्यासक्रमात ‘ऑनलाइन’ माध्यमातून १८ ते २० अतिरिक्त ‘क्रेडिट्स’ मिळविल्यानंतर
डिग्री विथ ऑनर्स : अभ़्यासक्रमातील प्रत्येक सत्रात उत्तीर्ण सात किंवा त्याहून अधिक ‘सीजीपीए’ मिळविल्यानंतर
विशेषाधिकारात घेतला निर्णय
११ डिसेंबर २०२० व १४ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या अभियांत्रिकी अभ्यास मंडळाच्या बैठकीत ‘एआयसीटीई’च्या निर्देशांनुसार ‘बीई’ व ‘बीटेक’साठी १६० ‘क्रेडिट्स’चा समान अभ्यासक्रम बनविण्याबाबत चर्चा झाली. नवीन शैक्षणिक कार्यक्रम तयार करत असताना त्यासाठी अध्यादेश जारी करावा लागतो. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने व नवीन सत्राच्या अगोदर बदलांना मंजुरी देणे आवश्यक असल्याने कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी विद्यापीठ कायद्याच्या कलम १२ (८) अंतर्गत संबंधित निर्णय घेतला.