पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदत वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:37+5:302021-02-05T04:44:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढणार आहे. यासंदर्भात ...

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदत वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेत प्रस्ताव मांडण्यात आला व कुलगुरुंनी त्याला तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भात विद्वत्त परिषदेची तातडीची बैठक बोलावून त्यात निर्णय घेण्याचे निर्देश कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी दिले.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. त्यामुळे प्रवेशाची मुदत वाढवावी व प्रवेशक्षमतेत २० टक्के वाढ करावी, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी केली. इतर सदस्यांनीदेखील याला अनुमोदन दिले. त्यानंतर ही मागणी मान्य करण्यात आली. दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मानव्यशास्र भवनाचे नामकरण ‘दत्तोपंत ठेंगडी मानव्यशास्र भवन’ असे करावे, असा प्रस्तावदेखील बैठकीदरम्यान मान्य करण्यात आला. अधिष्ठाता डॉ.निर्मलकुमार सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला.
‘इनडोअर स्टेडियम’साठी दिलेले पाच कोटी परत मागणार
नागपूर विद्यापीठातील ‘इनडोअर स्टेडियम’चे घोंगडे भिजत पडले आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलेले पाच कोटी परत मागणे व विद्यापीठाने स्वत:च हे ‘स्टेडियम’ बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी हा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. यासाठी प्रस्तावित अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद करण्याबाबतची दुरुस्ती मंजूर करण्यात आली.