दलालांचे प्रशासकीय कनेक्शन
By Admin | Updated: June 13, 2015 02:54 IST2015-06-13T02:54:49+5:302015-06-13T02:54:49+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या दाखल्यांच्या दलाली प्रकरणात दलालांसोबत एका उपजिल्हाधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

दलालांचे प्रशासकीय कनेक्शन
उपजिल्हाधिकारी, वरिष्ठ लिपीकही गोत्यात : निलंबनाची टांगती तलवार
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या दाखल्यांच्या दलाली प्रकरणात दलालांसोबत एका उपजिल्हाधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. प्रमाणपत्र बनविण्यासाठी दलालांच्या माध्यमातून कमाई करणाऱ्या या उपजिल्हाधिकाऱ्यासह वरिष्ठ लिपीक व स्टेनोसह काही कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी ्रकार्यालय परिसरातील सेतू आणि तहसील कार्यालय परिसरात सात दलालांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सेतू कार्यालयातील १० कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करुन त्यांना हटविण्यात आले होते.
सेतू कार्यालयावर नजर
नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक कारवाईमुळे दलालांच्या संपर्कात असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. कुर्वे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. यात महाआॅनलाईनच्या कर्मचाऱ्यांचे नावही समोर आले होते. आता त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनमुसार चौकशी दरम्यान असे आढळून आले की, काही अधिकारी आणि कर्मचारी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी दलालांकडून ३०० रुपयांपासून १ हजार रुपयापर्यंत घेत होते. यात एका उपजिल्हाधिकाऱ्याचे व वरिष्ठ लिपीक आणि स्टेनोचे नावही समोर आले आहे. दलालीत सर्वाधिक हिस्सा उपजिल्हाधिकाऱ्याला मिळत होता. दलाल प्रमाणपत्र बनविणाऱ्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना देणारा हिस्सा वगळून आपला वाटा वेगळा घेत होते. यापूर्वी सुद्धा या प्रकरणात एका उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव समोर आले होते. तेव्हा त्याला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)