प्रशासन, कर्मचारी आमने-सामने
By Admin | Updated: February 6, 2015 00:58 IST2015-02-06T00:58:13+5:302015-02-06T00:58:13+5:30
कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यावे, वेळेचे बंधन पाळावे या हेतूने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन्स लावण्यात आल्या.

प्रशासन, कर्मचारी आमने-सामने
बायोमॅट्रिक्स मशीनला विरोध : अपघातांचे प्रमाण वाढल्याची ओरड
नागपूर : कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यावे, वेळेचे बंधन पाळावे या हेतूने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन्स लावण्यात आल्या. परंतु कार्यालयात घाईगडबडीत येताना कर्मचाऱ्यांचे अपघात होत असल्याचे कारण पुढे करून या मशीनला रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवणे सुरू केले असून बायोमॅट्रिक्सबाबत रेल्वे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचा वाद दिवसेंदिवस चिघळत आहे.
रेल्वे कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर पूर्वी त्यांची नोंद एका रजिस्टरमध्ये होत होती. हे रजिस्टर सांभाळण्यासाठी एका कर्मचाऱ्यांला काम पाहावे लागत होते. परंतु बायोमॅट्रिक मशीनमुळे रेल्वे प्रशासनाच्या मनुष्यबळाची बचत होत आहे. जुलै २०१४ मध्ये रेल्वे प्रशासनाने ‘डीआरएम’ कार्यालयात ८ बायोमॅट्रिक मशीन तर रेल्वे रुग्णालयात दोन मशीन्स लावल्या. या मशीन्सला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने जोरदार विरोध केला. या मशीनमध्ये कर्मचारी कोणत्या वेळेला कार्यालयात हजर झाला याची नोंद होत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना ही मशीन डोकेदुखी ठरू लागली आहे. कार्यालयाने ठरवून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे सर्व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु तरीसुद्धा काही कर्मचारी या मशीनला विरोध करण्याचे काम करीत आहेत. कार्यालयात घाईगडबडीत येताना कर्मचाऱ्यांचे अपघात होत असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी योग्य वेळेवर घरून निघून सावकाश कार्यालयात पोहोचले तर अपघात टाळता येऊ शकतात, अशी रेल्वे प्रशासनाची भूमिका आहे. यामुळे भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)