प्रशासन ॲक्शन मोडवर, सुपर स्प्रेडरच्या सक्तीने चाचणी करणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:40+5:302021-03-13T04:13:40+5:30

नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेद्वारे युध्दस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या शहरात कोरोना रुग्णांची वाढती ...

Admin will force test Super Spreader in Action mode () | प्रशासन ॲक्शन मोडवर, सुपर स्प्रेडरच्या सक्तीने चाचणी करणार ()

प्रशासन ॲक्शन मोडवर, सुपर स्प्रेडरच्या सक्तीने चाचणी करणार ()

नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेद्वारे युध्दस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरण व चाचण्या वाढविण्यावर भर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात दहा नवीन लसीकरण केंद्र सुरू केले जातील. सोबतच शहरातील सुपर स्प्रेडर, हॉकर्स, वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या चाचण्यांवर नगरसेवकांच्या मदतीने भर देण्यात येणार असून सक्तीने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे.

शुक्रवारी महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पुढील उपाय योजना निश्चित करण्यासंदर्भात चर्चा व आढावा बैठक मनपा मुख्यालयात पार पडली. शहरात चाचण्या वाढविण्यासाठी ४० मोबाईल सेंटर्स सुरू करण्यात आले आहे. तसेच शहरात जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी पुढचे आठ दिवस ’नोंदणी मोहीम’ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नवीन दहा लसीकरण केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच गरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे बसची व्यवस्था करण्यात येईल, असेही मनपा आयुक्तांनी सांगितले.

बैठकीत उपमहापौर मनिषा धावडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर संदीप जोशी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, परिवहन समिती सभापती श्री. नरेन्द्र बोरकर, कर आकारणी व कर संकलन समिती उपसभापती सुनील अग्रवाल, उपसभापती विक्रम ग्वालबंशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. सागर पांडे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अति. सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, दहाही झोनचे सहायक आयुक्त, दहाही झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

पॉझिटिव्ह रुग्णांवर पाळत ठेवणार गणेश मंडळ

- गृह विलगिकरणात असणाऱ्या रुग्णांनी १४ दिवस बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नागपूर महापालिकेद्वारे कारवाईसुध्दा करण्यात येत आहे. मात्र अशा पॉझिटिव्ह रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, शारदा मंडळे, विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही यावेळी महापौरांनी केली.

कोरोना चाचणी कॅम्प लावा : महापौर

- कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी लसीकरणासोबतच जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. यासाठी ज्या परिसरात कोरोना रुग्णाची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी जनजागृती करावी. गरज पडल्यास स्थानिक नगरसेवकांची मदत घेउन त्या त्या परिसरात कोरोना चाचणी कॅम्प लावण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले. तसेच लसीकरणाचा पहिला डोज ज्या आरोग्य सेवकांना देण्यात आला आहे, त्यांना दुसरा डोज घेण्यासाठी अडचण होऊ नये यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी.

दुसरी लाट, ब्रेक लावणे आवश्यक : मनपा आयुक्त

-ही कोरोनाची दुसरी लाट असून यावर ब्रेक लावणे आवश्यक आहे. मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बध आवश्यक असल्यामुळे १५ ते २१ मार्च दरम्यान निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात नागपूर चाचण्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणखी चाचण्या वाढविण्यावर प्रशासन भर देत असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

बैठकीतील निर्देश

- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यावसायिक, सलून, हॉकर्स, पेपर वाटणारे, छोटे दुकानदार, ठेलेवाले, किराणा दुकानदार या सर्वांची चाचणी होणार.

- गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना वेळेवर औषधी देण्यात यावी. फोन करून वेळोवेळी त्यांची विचारपूस करावी.

- पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची त्वरित चाचणी करण्यात यावी.

शासकीय रुग्णालयांमध्ये २१४ रुग्ण भरती

- शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची व्यवस्था केली आहे. सध्या २१४ रुग्ण भरती आहेत आणि १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. खासगी रुग्णालयातून कोरोना बाधितांजवळीत पैसे संपल्यानंतर शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे. अखेरच्या स्थितीत रुग्ण पाठविल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणे कठीण असते, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Admin will force test Super Spreader in Action mode ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.