आदिवासी विद्यार्थ्यांना मेळघाटातच शिक्षण देणार
By Admin | Updated: July 8, 2014 01:12 IST2014-07-08T01:12:46+5:302014-07-08T01:12:46+5:30
मेळघाटातून स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांना गुराढोरांप्रमाणे कोंबून नेणाऱ्या स्कूल बसचालकावर पोलिसांनी कारवाई केली असून मेळघाटातील विद्यार्थ्यांची पळवापळवी थांबविण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांनी

आदिवासी विद्यार्थ्यांना मेळघाटातच शिक्षण देणार
स्कूल बसेसविरुद्ध कारवाई : आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती
चिखलदरा : मेळघाटातून स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांना गुराढोरांप्रमाणे कोंबून नेणाऱ्या स्कूल बसचालकावर पोलिसांनी कारवाई केली असून मेळघाटातील विद्यार्थ्यांची पळवापळवी थांबविण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित आश्रमशाळा व्यवस्थापनाला दिले आहेत.
मेळघाटातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना नियमबाह्यरित्या दुसऱ्या आश्रमशाळेत नेणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील शारदा ज्ञानमंदिरच्या दोन्ही स्कूल बसेसवर चिखलदरा व परतवाडा वाहतूक शाखेने कारवाई करून दंड ठोठावला.
२८ प्रवासी क्षमता असलेल्या या स्कूलबसेसमध्ये १५५ विद्यार्थी कोंबून नेले जात असल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आला होता.
युवक काँग्रेसचे मिश्रीलाल झाडखंडे, अमोल बोरेकार, राहुल येवले, पीयूष मालवीय आदींनी हा गंभीर प्रकार लक्षात येताच स्कूल बस थांबविल्या होत्या. दुसरी बस परतवाडा येथे थांबवून कारवाई करण्यात आली.
या बसमधील विद्यार्थ्यांना रात्री १०.३० वाजता शासकीय वसतिगृहामध्ये सोडण्यात आले. तेथे त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तर काटकुंभ येथील स्कूलबसमधील विद्यार्थ्यांना डोमा येथील शासकीय आश्रमशाळेत ठेवण्यात आले.
आश्रमशाळेतर्फे त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. धारणीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संजय मीना यांनी रात्रीच संबंधित कर्मचाऱ्यांना तसे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)