तोडलेले नळ कनेक्शन तात्पुरते जोडा
By Admin | Updated: January 12, 2016 03:07 IST2016-01-12T03:07:46+5:302016-01-12T03:07:46+5:30
काही दिवसांपूर्वी हरिओम सोसायटीतील अवैध नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली.

तोडलेले नळ कनेक्शन तात्पुरते जोडा
ग्राहक मंचचे निर्देश : कारवाईबाबतची चौकशी करा
वाडी : काही दिवसांपूर्वी हरिओम सोसायटीतील अवैध नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या मागणीसाठी नगरसेविका सगनबाई पटले यांनी उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत अखेर पालिका प्रशासनाने बुधवारी अवैध नळ कनेक्शन तोडले.
परंतु सदर कारवाई अन्यायकारक असून ती हेतुपुरस्सरपणे करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारकर्त्या गीता टेंभरे यांनी केला. या कारवाईविरोधात टेंभरे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाकडे धाव घेतली. त्यानुसार तोडलेले नळ कनेक्शन पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जोडण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
तक्रारकर्त्या गीता टेंभरे यांच्या अर्जातील विनंती क्रमांक २ मान्य करून ग्राहक मंचचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्य नितीन घरडे यांनी न. प. मुख्याधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात व अंतिम निकालाचे अधीन राहून नळ कनेक्शन जोडण्याचे निर्देश दिले. तसेच नगर परिषदेला आपली बाजू मांडण्यासाठी ११ जानेवारीला उपस्थित राहण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
सदर निर्णय व कारवाईवर अंमलबजावणीसाठी टेंभरे कुटुंबीय व त्यांचे सहकारी नगर परिषद कार्यालयात पोहोचले व त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडे आदेश दिले. मात्र मुख्याधिकारी सुटीवर असल्याचे कारण सांगत ही कारवाई तत्काळ करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचा तसेच वाडी पोलिसांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार केल्याचा आरोप टेंभरे यांनी पत्रपरिषदेत केला.
यावेळी नगरसेवक राजेश जयस्वाल, श्याम मंडपे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेश जिरापुरे, मधु मानके, प्रवीण लिचडे, दिलीप दोरखंडे, दिनेश उईके आदींनी नगरसेविका सगनबाई पटले यांनी राजकीय द्वेषापोटी टेंभरे कुटुंबीय विरोधात कारवाई केल्याचे सांगितले. त्यामुळे सदर कारवाईबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी टेंभरे व सहकाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)