ॲड. सतीश उके यांच्यावरील ईडीच्या कारवाईविरुद्ध वकील पुढे सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 20:29 IST2022-04-08T20:28:25+5:302022-04-08T20:29:14+5:30
Nagpur News नागपूर शहरातील काही वकिलांचा समूह उके यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. या समूहाचे प्रमुख ॲड. तरुण परमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना उके यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.

ॲड. सतीश उके यांच्यावरील ईडीच्या कारवाईविरुद्ध वकील पुढे सरसावले
नागपूर : विविध नेते, न्यायाधीश, पोलीस अधिकारी अशा प्रभावी व्यक्तींविरुद्ध सातत्यपूर्ण काही ना काही आरोप केल्यामुळे चर्चेत आलेले ॲड. सतीश उके यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. परिणामी, शहरातील काही वकिलांचा समूह उके यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. या समूहाचे प्रमुख ॲड. तरुण परमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना उके यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.
जमिनीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात तीन गुन्हे दाखल असल्यामुळे ॲड. उके व त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने उके बंधूंचा रिमांड मिळविण्यासाठी विशेष सत्र न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये संबंधित गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ईडीला केवळ मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार आहे. उके बंधूंवरील गुन्हे मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित नाही. परिणामी, ईडी त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. करिता, ही कारवाई बेकायदेशीर आहे. केवळ राजकीय दबावामुळे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई व्यापक कटाचा भाग आहे, असा दावाही ॲड. परमार यांनी केला. याप्रसंगी सुमारे १०० वकील उपस्थित होते. सुरुवातीला सर्वांनी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे गोळा होऊन कारवाईविरुद्ध घोषणा दिल्या.
जिल्हा विधिज्ञ संघटनेने केला निषेध
जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष ॲड. कमल सतुजा व ॲड. नितीन देशमुख यांनी ॲड. उके यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे गोळा केल्यानंतर कारवाईविरुद्ध कायदेशीर पाऊल उचलले जाईल, असे त्यांनी सांगितले.