बंदुकीने नाही, शिक्षणाने आदिवासींची स्थिती बदलेल
By Admin | Updated: October 12, 2015 02:49 IST2015-10-12T02:49:33+5:302015-10-12T02:49:33+5:30
आदिवासी समाजात अंधश्रद्धा आहे. आदिवासींची मुले कुपोषणाचे बळी ठरत आहेत.

बंदुकीने नाही, शिक्षणाने आदिवासींची स्थिती बदलेल
उमेश चौबे : गोंडी भाषिक आदिवासी
संस्थेचा लोकार्पण सोहळा थाटात
नागपूर : आदिवासी समाजात अंधश्रद्धा आहे. आदिवासींची मुले कुपोषणाचे बळी ठरत आहेत. तरी सरकार लक्ष देत नाही. यापुढील काळात आदिवासींनी केवळ मतदाता बनून राहू नये.
मात्र बंदुका हातात घेतल्यानेही आदिवासींची स्थिती बदलणार नाही. आदिवासींच्या दशेत परिवर्तन करायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी व्यक्त केले. गोंडी भाषिक संस्थेच्या लोकार्पण सोहळ््यात ते बोलत होते.
गोंडी भाषिक आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्थेचा लोकार्पण सोहळा रविवारी थाटात पार पडला. चंद्रमणी सभागृह, नवजीवन कॉलनी, वर्धा रोड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात समादेशक एन. झेड. कुंभरे, राजमाता राजश्री शाह, डॉ. पिनाक दंदे, वासुदेव टेकाम, संस्थेचे अध्यक्ष महादेव मडावी, उपाध्यक्ष तुकाराम गेडाम, शंकरराव मरसकोल्हे, ज्येष्ठ साहित्यिक मंसाराम कुंभरे आदी मान्यवर उपस्थित होते. उमेश चौबे म्हणाले, गोंडी भाषा या देशाची सर्वात जुनी भाषा आहे. निसर्गाचे गूढ उकलण्यासाठी ही भाषा टिकणे गरजेचे आहे.
त्यामुळे आदिवासी बांधवांनी तरी गोंडी भाषा व्यवहारात वापरून जिवंत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी वासुदेव टेकाम म्हणाले, वर्षनुवर्षे रानावनात राहणारा आदिवासी समाज स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही हलाखीचे जीवन जगत आहे.
या समाजावर कायम अन्याय करण्यात आला. राज्यघटनेत समाजाला आरक्षण दिले आहे, मात्र शिक्षणाअभावी त्याचा लाभ घेता आला नाही. उलट बोगस आदिवासींनी समाजाच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे. अशावेळी खऱ्या आदिवासींना मुख्य प्रवाहात यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
म्हणून आदिवासी बांधवांनो उपास-तापास सहन करा, मात्र आपल्या मुलांना शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. पिनाक दंदे यांनी आर्थिकदृष्ट्या सबळ झालेल्या समाजातील लोकांनी तळातील बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले. एन. झेड. कुंभरे यांनी, बोगस आदिवासीमुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये खऱ्या आदिवासींना फटका बसत असल्याचे सांगत, मुलांनी शिक्षण घेऊन पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त केली.
या कार्यक्रमादरम्यान समाजातील १० वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, समाजकार्यात योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सोबतच समाजातील उपवर वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. संचालन विकास तुमडाम यांनी केले. प्रदीप मसराम यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)