अॅक्टिव्हाची मोटरसायकलला धडक
By Admin | Updated: September 4, 2016 03:04 IST2016-09-04T03:04:28+5:302016-09-04T03:04:28+5:30
भरधाव अॅक्टिव्हाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

अॅक्टिव्हाची मोटरसायकलला धडक
तरुण ठार, एक जखमी : म्हाळणी शिवारातील घटना
कुही : भरधाव अॅक्टिव्हाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचालक तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळणी शिवारात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
सोपान माणिक तिजारे (२५, रा. ससेगाव) असे मृत तरुणाचे तर राकेश लक्ष्मण वैद्य (३५, रा. कुही) असे गंभीर जखमीचे नाव आहे. सोपान आणि राकेश एमएच-४०/बी-५५७१ क्रमांकाच्या मोटरसायक लने जात होते. तर, अनिल आनंद दुधपचारे (२१, रा. कुही) हा एमएच-४०/एटी-८६९५ क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने विरुद्ध दिशेने येत होता. दरम्यान, म्हाळणी शिवारात अनिलचा ताबा सुटल्याने भरधाव अॅक्टिव्हा समोरून येणाऱ्या मोटरसायकलवर धडकली. यात दुचाकीवरील सोपान व राकेश दोघेही जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही लगेच कुही येथील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी सोपानला तपासणीअंती मृत घोषित केले.
राकेशवर कुही येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुही पोलिसांनी दिलीप रामचंद्र तिजारे (४७, रा. ससेगाव) यांच्या तक्रारीवरून भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार धनिराम काळापे करीत आहेत. (प्रतिनिधी)