कर्जासाठी गहाण ठेवलेली शेती हडप करणारे रॅकेट सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:31+5:302021-06-02T04:08:31+5:30
कुही : शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष देत अवाच्या सव्वा व्याज आकारून ते वेळेत न दिल्यास ...

कर्जासाठी गहाण ठेवलेली शेती हडप करणारे रॅकेट सक्रिय
कुही : शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष देत अवाच्या सव्वा व्याज आकारून ते वेळेत न दिल्यास थेट शेतीच सावकार, दलालांकडून नावावर करण्याचा प्रकार कुही तालुक्यात वाढला आहे. याचे मोठे रॅकेट तालुक्यात सक्रिय असून, त्यात नागपूरच्या सावकारांचा समावेश आहे. लॉकडाऊनने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर सावकारीचा जाच आल्याने त्यांच्यासमोर हतबलतेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नाही. दुसरीकडे सावकारांना वेसण घालणाऱ्या निबंधक कार्यालयाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. सावकार प्रतिबंधक कायद्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.
असेच एक प्रकरण शिकारपूर येथील शेतकरी प्रकाश चौधरी यांच्यासोबत घडले. गतवर्षी योग्य पीक न झाल्याने व शेती सामायिक असल्याने बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. यानंतर चौधरी यांनी प्रवीण रामटेके नामक व्यक्तीसोबत संपर्क केला. रामटेके यांनी शेतीवर दोन टक्के व्याजाने रक्कम मिळवून देतो, त्याकरिता तुम्हाला तहसीलला यावे लागेल, असे सांगितले. तिथे माझा फोटो काढून स्टॅम्प पेपरवर अंगठा घेतला. मला दोन लाखांचे चेक दिले. इतक्या पैशांचे व्याज मी देऊ शकत नाही, असे म्हणत दोन दिवसांनी मी त्यांना ४५ हजार रुपये परत केले. मात्र, काही दिवसांनी माझ्या पुतण्यासह मी तलाठी कार्यालयात गेलो असता तिथे माझी शेती संजय मुरूसकर यांच्या नावे केल्याचे दिसून आले. याविषयी चौकशी केली असता व्याजाने पैसे देण्याच्या नावाने प्रवीण रामटेके व डोंगरे या व्यक्तीने माझी फसवणूक केल्याचे लक्षात आले.
यानंतर वेलतूर पोलीस ठाणे गाठून फसवणूक करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. दुसरी घटना रुयाड टेकेपार येथील नंदू जयराम सोनबावने यांच्यासोबत घडली. सोनबावने यांनी याबाबत वेलतूर ठाण्यात १८ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रार नोंदविली आहे. प्रवीण रामटेके यांनी क्षीरसागर यांची शेती माझ्या मालकीची आहे असे सांगून ७ लाख रुपयांत व्यवहार केला. त्यापैकी पाच लाख रुपये आरटीजीएसद्वारे प्रवीण रामटेके यांना दिले. मात्र, दुसऱ्या दिवशी करारनामा करण्यासाठी तहसील कार्यालयात गेलो असता रामटेके यांनी सातबाऱ्यामध्ये अफरातफर करीत करारनामा करण्यास दोन ते तीन दिवस लागतील, असे सांगितले. याबाबत शंका आल्यावर शेतीवर जाऊन बघितले. तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला विचारणा केली. त्यांनी ही शेती आपली असून, क्षीरसागर असे नाव सांगितले. तेव्हा प्रवीण रामटेकेकडून फसवणूक झाल्याचे सोनबावने यांना समजले. त्यामुळे प्रवीण रामटेके व त्यांच्या सहकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी नंदू जयराम सोनबावने, प्रकाश शिवाजी चौधरी, भगवान चौधरी, मनोज चौधरी यांनी केली आहे.
--
माझ्या गरजेचा फायदा घेत व्याजाने पैसे देतो म्हणत अॅग्रिमेंटच्या नावावर माझी फसवणूक करण्यात आली आहे.
- प्रकाश चौधरी, शेतकरी
--
नंदू सोनबावने व प्रकाश चौधरी यांच्या प्रवीण रामटेकेकडून केलेल्या शेती व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्याला प्राप्त आहे. तपासाअंती सत्य समोर येईल.
- किशोरकुमार वैरागडे, एपीआय, पोलीस ठाणे, वेलतूर