नागपूर फ्लाईंग क्लब कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:51+5:302021-01-08T04:24:51+5:30

नागपूर : विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबला दोन महिन्यामध्ये पूर्ण क्षमतेसह कार्यान्वित करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च ...

Activate Nagpur Flying Club | नागपूर फ्लाईंग क्लब कार्यान्वित करा

नागपूर फ्लाईंग क्लब कार्यान्वित करा

नागपूर : विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबला दोन महिन्यामध्ये पूर्ण क्षमतेसह कार्यान्वित करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला. तसेच, क्लबची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे सरकारवर ताशेरे ओढले.

यासंदर्भात सुमेधा घटाटे व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी न्यायालयाने क्लबच्या पुनरुज्जीवनासाठी विविध निर्देश दिले होते. परंतु, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. क्लबच्या पुनरुज्जीवनाचे काम थोडेही पुढे सरकले नाही. क्लब अद्यापही बंदच असून येथील सर्व उपकरणे, यंत्रे व सुविधा व्यर्थ ठरत आहेत. क्लब अतिशय दयनीय अवस्थेत आहे. न्यायालयाने ही बाब गंभीर असल्याचे सरकारला सांगितले. तसेच, हा क्लब दोन महिन्यामध्ये पूर्ण क्षमतेसह कार्यान्वित करण्याचा आदेश देऊन अन्य मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावर १३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. श्रीनिवास देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

------------

कर्मचाऱ्यांना अवैधरीत्या नोकरीवरून काढले

दरम्यानच्या काळात नागपूर फ्लाईंग क्लबमधील काही कर्मचाऱ्यांना अवैधरीत्या नोकरीतून काढून टाकण्यात आले आणि त्यांच्या जागेवर अवैधपणे नवीन कर्मचारी भरण्यात आले असा आरोप होत आहे. न्यायालयाने याचाही आदेशात उल्लेख करून सरकारचे कान टोचले.

-----------

विभागीय आयुक्तांना फटकारले

यापूर्वी दिलेल्या विविध निर्देशांचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांना कडक शब्दांत फटकारले. विभागीय आयुक्तांनी न्यायालयाच्या निर्देशांना गंभीरतेने घेतले नाही. पुढेही अशी भूमिका राहिल्यास कडक कारवाई करून न्यायालयाच्या निर्देशांचे महत्त्व पटवून दिले जाईल, असे विभागीय आयुक्तांना सांगण्यात आले.

-----------

‘सीएफआय’ची नियुक्ती करा

नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर (सीएफआय)ची नियुक्ती अनेक महिन्यापासून रखडली आहे. दरम्यान, कॅप्टन शिवकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पुढे आला होता. त्याच्या नियुक्तीवर निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. परंतु, अद्याप ही नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी, न्यायालयाने चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरच्या नियुक्तीची कार्यवाही दोन आठवड्यामध्ये पूर्ण करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांना दिला.

------------

असे आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणे

विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबची प्रगती व्यवस्थापनातील असक्षम अधिकाऱ्यांमुळे थांबली आहे. व्यवस्थापनामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तेव्हा तेव्हा क्लबने उंच भरारी घेतल्याचा इतिहास आहे. सध्या मात्र क्लबची अवस्था चांगली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Activate Nagpur Flying Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.