नागपूर : ग्राहक कल्याण समिती, राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन व पोलीस मित्र यांच्यावतीने नायलाॅन मांजाची विक्री व वापर थांबविण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. जीवघेण्या माजांचा वापर तातडीने थांबवावा, अशी विनंती केली. विनंतीला जुमानत नसाल, तर आम्ही कायद्याचे ब्रह्मात्र उगारू आणि तुम्हाला कोठडीत टाकू, अशी राेखठाेक भूमिका घेत नायलॉन मांजा विक्रेत्यांना दम देण्यात आला.
नायलॉन मांजाची विक्री थांबवण्यासाठी प्रशासनातर्फे आव्हान करण्यात येत असतानाही विक्रेते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. यामुळे अनेकांना रस्त्यावर जीव गमवावे लागतात. दरवर्षी अनेक माणसे गंभीर जखमी हाेतात, शिवाय शेकडाे मुक्या पक्ष्यांना प्राण गमवावे लागतात. नायलॉन मांजा घातक असून, त्याचा वापर नागरिकांनी करू नये व विक्रेत्यांनी विक्री थांबवावी, असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. रॅली पडोळे चौक, माटे चौक, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर हाेत पोलीस ठाण्यात समारोप झाला. ग्राहक कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आशिष अटलोए व प्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ठोसरे यांच्या मार्गदर्शनात काढलेल्या रॅलीत पाेलीस उपनिरीक्षक कैलास कुथे, डॉ. वैशाली अटलोए, त्रिशा अटलोए, सचिन सोमकुंवर, शीलदेव दोडके, खैसर मोहम्मद, अनिता ध्यानी, कृष्णा भोयर, साक्षी ठवस, रिचा ध्यानी, सूर्यकांत निमजे, नंदा निमजे, कपिल खंडेलवाल, राकेश डोंगरदिवे, नीलेश नागोलकर, सुशील मौर्या, अशोक गाडेकर, नितीन तिवारी आदींचा सहभाग हाेता.