चौघांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई

By Admin | Updated: November 13, 2015 02:59 IST2015-11-13T02:59:26+5:302015-11-13T02:59:26+5:30

दुखापत करून जबरी चोरी, खंडणी वसुली, खून यासह इतर गुन्हे संघटितपणे करणाऱ्या चार आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली.

Action taken under 'Moka' on Fourth | चौघांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई

चौघांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई

२३ गुन्ह्यांची नोंद : वाडीसह परिसरात आरोपींची दहशत
वाडी : दुखापत करून जबरी चोरी, खंडणी वसुली, खून यासह इतर गुन्हे संघटितपणे करणाऱ्या चार आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली. या चारही आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले. वाडी, एमआयडीसीसह इतर पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
प्रकाश शंकर बमनोटे (४५, रा. द्रुगधामणा, वडार मोहल्ला), दिनेश ऊर्फ दादू सुखदेव लांजेवार (२५, रा. राठी ले-आऊट, आठवा मैल, वाडी), राधेश्याम विठ्ठल उईके (२६, रा. द्रुगधामणा) आणि गिरधर रतिराम ठाकरे अशी आरोपींची नावे आहेत. प्रकाश बमनोटेविरुद्ध १९८६ पासून आजपर्यंत एकूण २३ गुन्ह्याची नोंद वाडी पोलीस ठाण्यात आहे. तो प्रमुख असलेल्या टोळीने आतापर्यंत खून, चोरी, सार्वजनिक ठिकाणी मारहाण, घरफोडी, अवैधरीत्या विना परवाना शस्त्र बाळगणे, दारूविक्री, जबरी चोरी, खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, हप्ता वसुली अशाप्रकारचे गुन्हे केले. त्यामुळे समाजात दहशत निर्माण करून भीतीयुक्त वातावरण तयार झाले होते. कुख्यात गुंड भारत ताराचंद बन्सोड याचा २००८ मध्ये डिफेन्स परिसरातील खूनप्रकरणातही त्याचा हात होता. तसेच आॅगस्ट २०१५ मध्ये गणेशनगर झोपडपट्टी, आठवा मैल येथे यशोदा पाटील यांना मारहाण करून दागिने आणि रोख २२ हजार रुपये असा ऐवज या चार आरोपींनी लंपास केला होता. या प्रकरणात या चारही आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या चारही आरोपींमुळे समाजातील शांतता भंग होत असून भीतीचे वातावरण तयार झाले. त्यांच्यावर प्रतिबंधित कारवाई करूनही कोणताही परिणाम होत नसल्याने परिमंडळ क्र. १ चे पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे व एमआयडीसी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पी. जी. माने यांच्या मार्गदर्शनात वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वाय.एस. खरसान यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये गुन्हा नोंदवून स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत करवडे यांच्याकडे पाठविला. त्यास मंजुरी देण्यात येऊन या चारही आरोपींवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही कारवाई परिमंडळ क्र. १ चे उपायुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, दुय्यम पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक खरसान यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Action taken under 'Moka' on Fourth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.