बार-वॉईन शॉप सील करण्याची कारवाई सुरू
By Admin | Updated: April 1, 2017 02:54 IST2017-04-01T02:54:43+5:302017-04-01T02:54:43+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शुक्रवारी मध्यरात्रीपासून राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटर परिसरातील बार

बार-वॉईन शॉप सील करण्याची कारवाई सुरू
शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरुवात : ५४३ बार व ३२८ वॉईन शॉप होणार सील
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शुक्रवारी मध्यरात्रीपासून राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटर परिसरातील बार आणि वॉईन शॉपला सील ठोकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईवरून आदेश येताच ५४३ बार व ३२८ वॉईन शॉपला सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटर परिसरातील दारूची दुकाने आणि बार १ एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यात मोठे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचाही समावेश आहे. दारू पिऊन वाहन चालवण्याची प्रवृत्ती (ड्रंकन ड्राईव्ह) थांबवण्यासंदर्भात दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या आदेशांतर्गत बार किंवा वाईन शॉप इतके दूर असावेत की, ते महामार्गावरून जाताना दिसू सुद्धा नयेत.
न्यायालयाचा आदेश जारी झाल्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त संजीव कुमार यांनी सर्व विभागीय मुख्यालय आणि जिल्हा अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. शुक्रवारी ३१ मार्च असल्याने विभागाने महसुलाची कारवाई पूर्ण केली. त्यानंतर मध्यरात्रीपासून बार आणि दारू दुकाने सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात ५०० मीटर क्षेत्रात येणाऱ्या ५४३ बार आणि ३२८ दारू दुकाने सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती असणाऱ्यांनी अगोदरच आपली दुकाने बंद केली आहेत.
उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी सर्व ठिकाणी जाऊन पाहणी करीत आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात येणारे बार आणि दारू दुकान सुरू दिसल्यास ते सील करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)