रुग्णांची अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई : आरोग्यमंत्री राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:28 IST2020-09-25T21:27:30+5:302020-09-25T21:28:41+5:30
खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम जमा करून अडवणूक करण्याच्या तक्रारी येत असून अशी अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे कडक निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.

रुग्णांची अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई : आरोग्यमंत्री राजेश टोपे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम जमा करून अडवणूक करण्याच्या तक्रारी येत असून अशी अडवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे कडक निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.
आयुक्तालयात आयोजित बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर संदीप जोशी, खासदार कृपाल तुमाने, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सुधाकर शिंदे, अर्चना पाटील, आयएमएचे अध्यक्ष संजय देवतळे, अर्चना कोठारी यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांकडून पैसे जमा केल्याशिवाय उपचार केल्या जात नसल्याच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या हॉस्पिटलविरुद्ध कारवाई करण्यासाठी आयएमएने सहकार्य करावे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
महत्त्वाचे मुद्दे
होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना टेलिमेडिसीन उपचार पद्धती तात्काळ सुरू करावी.
औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करावी.
प्लाझ्मा थेरेपीचे काम मेडिकलमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू.
वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सेवा पुणे-मुंबई येथे न घेता नागपुरातच उपलब्ध करून देण्यात येतील.