स्मार्ट सिटीसाठी अॅक्शन प्लॅन
By Admin | Updated: March 15, 2017 02:25 IST2017-03-15T02:25:49+5:302017-03-15T02:25:49+5:30
संदीप जाधव यांनी सांगितला विकासाचा अजेंडा, प्रगतिपथावरील प्रकल्पांसाठी निधी ;

स्मार्ट सिटीसाठी अॅक्शन प्लॅन
संदीप जाधव यांनी सांगितला विकासाचा अजेंडा, प्रगतिपथावरील प्रकल्पांसाठी निधी ; उत्पन्न वाढीसाठी नियोजन
नागपूर : उपराजधानी पुढील काही वर्षात देशातील टॉप स्मार्टसिटी होणार आहे. या दृष्टीने विकास कामे सुरू आहेत. परंतु ती जलद गतीने व्हावी, सोबतच शहराच्या सौंदर्यीकरणाला अधिक प्राधान्य देणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जाधव यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी चर्चा करताना शहर विकासाचे ‘व्हीजन’ मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविलेल्या शहर विकासाच्या मार्गावर महापालिकेचा कारभार सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारकडून प्रथमच विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. परंतु शहर विकासात महापालिकेचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असल्याने आर्थिक स्थिती भक्कम करावी लागेल. ज्या-ज्या मार्गाने महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होतो, अशा विभागांचा क्रमवार आढावा घेऊ न नवीन आर्थिक स्रोत शोधण्याचा प्रयत्न राहील.
महाल व सक्करदरा येथील बुधवार बाजार, आॅरेंज सिटी स्ट्रीट, सोख्ताभवन असे विकास प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. महापालिका आयुक्त २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावर अभ्यास करून एप्रिल महिन्यात स्थायी समितीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करू. प्रगतिपथावरील प्रकल्पांना निधीची कमतरता भासू नये यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात येईल, अशी माहिती जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)
दिलेल्या आश्वासनांची पूर्तता
महापालिका निवडणुकीत भाजपाने जाहीरनाम्याच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आश्वासने दिलेली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. पुढील पाच वर्षात त्याची पूर्तता होईल. अशी ग्वाही जाधव यांनी दिली.
सिमेंट रस्त्यांसाठी १०० कोटी
नागपूर शहरात ७२० कोटींचे सिमेंट रस्ते होत आहेत. तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटींच्या रस्त्यांचा समावेश आहे. यात राज्य सरकार व नागपूर सुधार प्रन्यास तसेच महापालिकेचा प्रत्येकी १०० कोटींचा वाटा आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.
शाळांचा दर्जा सुधारणार
महापालिके च्या शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. सोबतच अत्याधुनिक साधनांचा वापर केला जाईल. यासाठी शिक्षकांना कामाला लावणार असल्याचे जाधव म्हणाले.
तलाव व चौकांचे सौंदर्यीकरण
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. विकासोबतच सौंदर्यीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे. याचा विचार करता शहरातील बगिचे, तलाव व प्रत्येक चौकांचे सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद ठेवली जाणार आहे.
करवसुलीसाठी व्यापक मोहीम
महापालिकेची र्आिर्थक स्थिती विचारात घेता, कर वसुलीसाठी व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. शहरातील सर्व मालमत्तांवर कर आकारणी करून वसुली, तसेच जलप्रदाय, नगर रचना व बाजार विभागांच्या वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.