वाळू माफियांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा अॅक्शन प्लॅन
By Admin | Updated: November 26, 2014 01:08 IST2014-11-26T01:08:42+5:302014-11-26T01:08:42+5:30
रेतीचे अवैध उत्खनन करून सरकारला कोट्यवधींचा फटका देणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी अॅक्शन प्लॅन बनविला आहे.

वाळू माफियांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा अॅक्शन प्लॅन
नागपूर : रेतीचे अवैध उत्खनन करून सरकारला कोट्यवधींचा फटका देणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी अॅक्शन प्लॅन बनविला आहे. दुसरीकडे शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याने वाळू माफियांना आज सावधानतेचा इशारा देत सतर्कतेने काम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.
रेतीघाट बंद असूनदेखील नागपूर शहरात रोज ३०० ते ४०० ट्रक रेती येते. वैनगंगेच्या पात्रातून ही रेती चोरून आणली जाते. सर्वाधिक रेती रोहा, बेताळा, कोतुर्णा, टाकळी, खमाटी या घाटावरून काढली जाते. यापैकी काही ठिकाणी वाळू माफियांनी चक्क मशीनच लावल्याची सूत्रांची माहिती आहे.
वाळू माफिया ट्रकचालकांना दारू पाजून प्रमाणापेक्षा जास्त (ओव्हरलोड) रेती भरून भंडारा, रामटेक, उमरेड(पवनी)मार्गे ही रेती नागपुरात आणतात. पोलीस, परिवहन विभाग (आरटीओ) आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना त्याची माहिती असते. मात्र, यातून त्यांना त्यांचा हिस्सा रोजच हातात पडत असल्यामुळे या तस्करीकडे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
आज लोकमतने ठळकपणे रेती तस्करीचे वृत्त प्रकाशित करताच वाळू माफिया आणि भ्रष्ट यंत्रणेचे धाबे दणाणले. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील वाळू माफियांनी ठिय्ये रिकामे करण्यासाठी धडपड चालवली.
पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने आपल्या हस्तकामार्फत वाळू माफियांना निरोप पाठवून सतर्कतेने काम करण्याचा सल्ला दिल्याचे समजते.
दुसरीकडे वाळू माफियांच्या विरोधात आपण अॅक्शन प्लॅन तयार केला असून, लवकरच त्याचे परिणाम बघायला मिळतील,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आज लोकमतला दिली. कारवाईची योजना कशी असेल, हे सांगणे योग्य होणार नाही. मात्र, सांगण्यापेक्षा कृतीच करून दाखवू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी)
असोसिएशनचा आरोप
वाळू माफियांना पोलीस, आरटीओ आणि महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ असल्यामुळेच रोज लाखोंच्या रेतीची तस्करी केली जात असल्याचा आरोप युनायटेड लोकल ट्रक असोसिएशनने केला. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच आज असोसिएशनचे अध्यक्ष शंकर गुप्ता तसेच साजीदखान समशेर खान, अतिक आलम, अशोक रामलखन पवन, प्रवीण दुल्हेवाले, भागवत मेश्राम, आसिफ खान बबलू कुरेशी यांनी एक प्रसिद्धी पत्रक दिले. पोलीस, महसूल आणि आरटीओंकडे वारंवार लेखी तक्रारी करून, पुरावे देऊनही वाळू माफियांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप उपरोक्त पदाधिकाऱ्यांनी या प्रसिद्धी पत्रकातून केला.