नितीन उकेंवर चौकशीनंतर कारवाई

By Admin | Updated: July 8, 2015 03:03 IST2015-07-08T03:03:57+5:302015-07-08T03:03:57+5:30

भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारीवरून नागपूर येथील मोटर वाहन निरीक्षक नितीन उके यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून ...

Action on inquiry by Nitin Uken | नितीन उकेंवर चौकशीनंतर कारवाई

नितीन उकेंवर चौकशीनंतर कारवाई

‘एसीबी’ चे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : पुढील सुनावणी २० तारखेला
नागपूर : भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारीवरून नागपूर येथील मोटर वाहन निरीक्षक नितीन उके यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
विभागाच्या वतीने गोंदिया येथील उप-अधीक्षक डी. ए. ठोसरे यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले. व्यावसायिक अनिल आग्रे यांच्यासह सहाजणांनी फौजदारी रिट याचिका दाखल करून नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक केली जात असल्याचा आणि अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू असल्याचा दावा केला आहे. याचिकाकर्त्यांनी उके यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रारी केल्या होत्या.
त्यावरून पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागाने भ्रष्ट वाहतूक अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी दोनदा सापळा रचला होता पण, लाच मागण्याचा प्रकार आढळून आला नाही. परिणामी पुढील प्रक्रिया थांबविण्यात आली असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणावर आता २० जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
राज्य शासनाने १२ मार्च २०१३ रोजी रेती उत्खनन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार रेती उत्खनन करण्यापूर्वी पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक आहे. याशिवायही विविध नियम आहेत. परंतु, धोरणातील नियमांचे कोणीच पालन करीत नाही. जिल्हाधिकारी, परिवहन अधिकारी, तहसीलदार, तलाठी, पोलीस व कंत्राटदार यांच्या आपसी सहमतीने सर्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे. वाहनांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून वाहतूक केली जाते असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Action on inquiry by Nitin Uken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.