गांधीविचारांवर कृती दूरच, साधी स्मृतीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:25+5:302020-12-25T04:08:25+5:30

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्याला असहकार आंदोलनाची देशव्यापी आक्रमक देणगी देणाऱ्या नागपूर येथील १९२० ...

Action on Gandhian thought is far from a simple memory | गांधीविचारांवर कृती दूरच, साधी स्मृतीही नाही

गांधीविचारांवर कृती दूरच, साधी स्मृतीही नाही

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्याला असहकार आंदोलनाची देशव्यापी आक्रमक देणगी देणाऱ्या नागपूर येथील १९२० च्या काँग्रेस अधिवेशनाचा सगळ्यांनाच विसर पडला आहे. याच अधिवेशनात देशाच्या राजकारणाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ते महात्मा गांधी असे ऐतिहासिक वळण मिळाले. पण, शताब्दीच्या निमित्ताने विचारमंथन, कृतिशील स्मरण वगैरे दूरच, अधिवेशनाची साधी स्मृतीही जपली गेली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

काँग्रेसचे ३५ वे अधिवेशन २६ ते ३१ डिसेंबर १९२० दरम्यान नागपूर येथे झाले. सहापैकी चारच दिवस कामकाज झाले. दोन दिवस सुटी होती. मद्रास प्रांतातील चक्रवर्ती विजय राघवाचारी अध्यक्ष, उद्योगपती जमनालाल बजाज स्वागताध्यक्ष, तर हिंदू महासभेचे नेते डॉ. बा. शि. मुंजे स्वागत समितीचे सरचिटणीस होते. नागपूरमध्ये भरलेले ते दुसरे अधिवेशन. १८९१ मधील सातवे अधिवेशन नागपूरमध्ये पनाबाक्कम आनंद चार्लू या दाक्षिणात्य नेत्यांच्याच अध्यक्षतेखाली झाले होते. १९०७ मध्येही शहरात काँग्रेस अधिवेशन घेण्याचा प्रयत्न झाला. पण, जहाल-मवाळ दुभंगामुळे यशस्वी झाला नाही. बंगालची फाळणी नुकतीच झाली होती. देशभरात अस्वस्थता होती. जहाल पक्षाला अध्यक्षपदी लोकमान्य टिळक तर मवाळ पक्षाला रासबिहारी बोस हवे होते. बोस गटाला अधिवेशन नागपूरला हवे होते. जहाल गटाचा त्याला विरोध होता. परिणामी, ते अधिवेशन सुरतला झाले. तिथे गोंधळ झाला, पक्षात उभी फूट पडली. अधिवेशन गुंडाळावे लागले.

नेतृत्व टिळकांकडून गांधींकडे

असहकार आंदोलनावर शिक्कामोर्तब, स्वराज्य हा काँग्रेसचा नवा हेतू आणि लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर लगेच महात्मा गाधींकडे राष्ट्रीय राजकारणाच्या बॅटनचे हस्तांतरण ही नागपूर अधिवेशनाची तीन वैशिष्ट्ये. टिळक हे देशाचे सर्वोच्च नेते असूनही त्यांना कधी काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले नाही. राजद्रोहाच्या खटल्यातील शिक्षा मंडाले तुरुंगात भोगून परत आल्यानंतर १९१६ च्या लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी टिळकांची बिनविरोध निवड झाली खरी. परंतु, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या विरोधातील खटला लढण्यासाठी टिळक १८१८ पर्यंत इंग्लंडमध्ये अडकून पडले. लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविता आले नाही. १९१९ मध्ये ते परत येताच त्यांच्या विदर्भातील अनुयायांनी संधी साधण्याचे ठरविले. आधी अधिवेशन नागपूर की जबलपूर, असा वाद होता. अखेर नागपूरचा निर्णय झाला. पण, टिळकांच्या नशिबी काँग्रेसचे अध्यक्षपद नव्हतेच. नागपूरकर मंडळी अधिवेशनाची तयारी जोमाने करीत असतानाच १ ऑगस्टला मुंबईत टिळकांचे निधन झाले. तयारी करणाऱ्या पाठीराख्यांवर जणू वज्राघात झाला.

ना स्मृती, ना चिरा, ना पणती

नागपूरमधील ज्या काँग्रेसनगर परिसरात हे अधिवेशन झाले, तिथे वसाहतीचे नाव वगळता इतक्या महत्त्वाच्या घटनेची कसलीही स्मृती नाही. इतिहासातील सर्वांत कठीण कालखंडातून जात असलेल्या काँग्रेस पक्षाला या अधिवेशनाच्या शताब्दीचे सोयरसुतक नाही. त्याचप्रमाणे, हे अधिवेशन यशस्वी करणाऱ्या बहुतेक सर्व शिलेदारांनी, टिळकपर्वाची अखेर झाल्यामुळे, गांधींचा मार्ग न रुचल्याने किंवा आणखी काही कारणांनी पाच वर्षांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. भारतीय राजकारणात नवा सांस्कृतिक प्रवाह निर्माण झाला. पण, या गंगेलाही आपल्या गंगोत्रीचे स्मरण करावे, असे वाटले नाही.

देशाला मिळाली ‘गांधी टोपी’

१९१९ मध्ये महात्मा गांधी यांनी वापरलेल्या टोपीला ‘गांधी टोपी’ असे नाव पडले. मात्र नागपूरच्या अधिवेशनानंतर या टोपीची देशभरात मोठ्या प्रमाणावर ओळख झाली. नागपूरच्या अधिवेशनात सर्वच प्रतिनिधी हे स्वदेशी पोशाखात आले होते व बहुतांश जणांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. यासाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती. याच गांधी टोपीने राष्ट्रीय सेवेचे प्रतीक बनत इतिहास रचला. मात्र गांधी टोपीसाठी झटणाऱ्या प्रतिनिधींना मात्र इतिहासात स्थान मिळू शकले नाही.

Web Title: Action on Gandhian thought is far from a simple memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.