ठराविक कंत्राटदारांवरच कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 02:30 IST2016-08-28T02:30:36+5:302016-08-28T02:30:36+5:30
रस्त्यावरील उखडलेले डांबर व खड्ड्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. यासाठी शहरातील नागरिक महापालिकेला जबाबदार मानत आहे.

ठराविक कंत्राटदारांवरच कारवाई
उखडलेल्या रस्त्यांची चौकशी : अधिकाऱ्यांना मिळणार क्लीन चिट
नागपूर : रस्त्यावरील उखडलेले डांबर व खड्ड्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. यासाठी शहरातील नागरिक महापालिकेला जबाबदार मानत आहे. महापालिका सभागृहातही या विरोधात विरोधी सदस्यांनी आवाज उठविला होता. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. अखेर महापौर प्रवीण दटके यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगरसेवक व अधिकाऱ्यांची समिती गठित केली होती. समितीची चौकशी पूर्ण झाली आहे. परंतु समितीच्या चौकशी अहवालात ठराविक कंत्राटदारांना दोषी ठरवून अधिकाऱ्यांना क्लीन चिट मिळणार असल्याची माहिती आहे.
महापौरांनी १५ दिवसात चौकशी करण्याचे निर्देश दिले होेते. परंतु समितीची घोषणा ११ दिवसानंतर करण्यात आली. स्थापत्य समितीचे सभापती सुनील अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करीत आहे.
सोमवारी समितीकडून आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी दोषीवरील कारवाई निश्चित होणार आहे.
उखडलेल्या रस्त्यांसाठी कंत्राटदारासोबतच उपअभियंता व अधिकारी जबाबदार आहेत. दोघांच्या संगनमताशिवाय निकृष्ट काम शक्य नाही. दायित्व कालावधी संपण्यापूर्वी जे रस्ते उखडलेले आहेत अशा रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात येईल. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची शक्यता नाही. यावर आक्षेत घेतलाच तर कंत्राटदारांना अतिरिक्त दंड आक ारला जाण्याची शक्यता आहे. उपअभियंत्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली होती. ती भरून घेण्यात आली आहे. प्रश्न नेमके कोणते होते याचा खुलासा करण्यास मात्र समितीने नकार दिला.(प्रतिनिधी)