बोगस डॉक्टरवर कारवाई
By Admin | Updated: March 26, 2015 02:37 IST2015-03-26T02:37:59+5:302015-03-26T02:37:59+5:30
कोणतीही पदवी नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणारे जुनी शुक्रवारी भागातील गांधी पुतळा येथील ...

बोगस डॉक्टरवर कारवाई
नागपूर : कोणतीही पदवी नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणारे जुनी शुक्रवारी भागातील गांधी पुतळा येथील बोगस डॉ. रमेन महानंद गोलदार याच्याविरुद्ध महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गोलदार यांच्याविरोधात आरोग्य विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याने शुक्रवारी येथे साईबाबा पाईल्स रुग्णालयाचे फलक लावून रुग्णालय सुरू केले होते. त्यावर बीएएमएस, बीईएमएस असे लिहिले होते. तसेच शस्त्रक्रिया न करता पाईल्सवर रामबाण उपचार केले जातात. मूळव्याध, भगंदर व गुप्तरोगावर उपचार करण्याचा दावा केला होता. आरोग्य विभागाच्या पथकाने चौकशी केली असता संबंधित डॉक्टर आयुर्वेदिक व अॅलोपॅथी औषधाचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या रुग्णालयात काही रुग्ण उपचार घेताना आढळून आले.
वैद्यकीय व्यवसायाविषयी दस्तऐवज मागितले असता गोलदार याने असमर्थता व्यक्त केली. त्याच्याकडे वैद्यकीय परिषदेचे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले.
असे असूनही तो हा व्यवसाय करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यासंदर्भात कोतवाली पोलिसांना सूचना देण्यात आली. डॉ. सुनील घुरडे यांनी पोलिसात रीतसर तक्रार नोंदविली. या क ारवाईत डॉ. विजय तिवारी, डॉ. विजय जोशी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)