भाजपातर्फे दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: March 14, 2017 20:26 IST2017-03-14T20:26:35+5:302017-03-14T20:26:35+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आता भाजपाने पक्षशिस्तीचे कठोर पालन करण्याकडे लक्ष केंद्रित केले

भाजपातर्फे दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आता भाजपाने पक्षशिस्तीचे कठोर पालन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शहर महामंत्री विजय आसोले व दक्षिण मंडळ महामंत्री बंडू शिरसाट या दोन पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीनंतरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
संबंधित दोन्ही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्या अशा तक्रारी होत्या. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, संबंधितांनी स्पष्टीकरण सादर केले नाही. त्यामुळे दोघांनाही सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. प्रत्यक्ष निवडणूक न लढणाऱ्यांचा यात समावेश नव्हता. मात्र, आता निवडणुकीनंतर बंडखोरांना साथ देणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.
भाजपला महापालिकेत एकतर्फी यश मिळाले. संख्याबळ वाढले. मात्र, या उत्साहात प्रत्येकाला पक्षशिस्तीचे भान असावे, तसेच पक्षविरोधी भूमिका घेतली तर माफी नाही, असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यासाठी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
आणखी काहींवर कारवाई
- भाजपाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रभागातील विजयी व पराभूत उमेदवार संबंधितांविरोधात असलेले पुरावे पक्षाकडे जमा करीत आहेत. हे पुरावे गोळा झाल्यानंतर आणखी काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.